दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये हे स्पष्ट दिसतंय की एका माणसाने मुलीला चाकूने आधी भोसकलं, त्यानंतर एका दगडाने तिला ठेचून तिची हत्या केली. ही घटना घडत असताना काही लोक तिथून येताना-जाताना दिसत आहेत परंतु कोणीही त्या मुलीला वाचवलं नाही किंवा मारेकऱ्याला रोखलं नाही.
मारेकरी साहिल घटनास्थळावरुन फरार झाला होता. त्याला पोलिसांनी बुलंदशहरमधून अटक केली आहे. दरम्यान, मृत तरुणीच्या वडिलांनी आपल्या मुलीची अवस्था पाहून टाहो फोडला. ते म्हणाले, मी पाहिलं तेव्हा माझ्या मुलीची अवस्था अत्यंत वाईट होती. तिच्या पोटात चाकूचे अनेक वार झाले होते. आतडं बाहेर आलं होतं. दगडाने ठेचल्यामुळे तिच्या डोक्याचे चार तुकडे झाले होते.
पीडितेच्या वडिलांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, पोलीस माझ्याआधीच घटनास्थळी पोहोचले होते. साहिल नावाच्या मुलाने ही हत्या केली आहे. कधी तिच्याकडून किंवा तिच्या मैत्रिणीकडून त्याच्याबद्दल ऐकलं नाही. त्या दोघांच्या मैत्रीबाबत मला काही माहित नाही. आम्ही तिला सोबत घेऊन जात होतो तेव्हा कधीही तिच्याशी कुणीही छेडछाड केली नाही. त्याचबरोबर या दोघांमध्ये काही ओळख होती का वगैरे मला माहित नाही.
पीडितेचे वडील म्हणाले, साहिल शाहबाद डेअरी भागातच राहतो. माझी मुलगी शाळेत जात होती. माझ्या मुलीला अत्यंत निर्घृणपणे मारण्यात आलं. तिची हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. असं करण्याची कुणाची हिंमत पुन्हा होता कामा नये इतकं कठोर शासन त्याला झालं पाहिजे.