Delhi Viral Video Fight over Parking : दिल्लीमध्ये वाहन पार्क करण्यावरून भांडण होणं, हाणामाऱ्या होणं नेहमीचंच झालं आहे. अनेकदा ही भांडणं इतकी विकोपाला जातात की दोन टोळ्यांचे एकमेकांवर हल्ले झाल्याच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. अशातच दिल्लीमधील वाहनांच्या पार्किंवरून एक मोठं भांडण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी व तिची आई एका तरुणाबरोबर वाद घालताना दिसत आहेत. तरुणी या तरुणाला शिवीगाळ करताना दिसतेय. मायलेकी तरुणाला धमकावताना व माझी दुसरी मुलगी आयपीएस अधिकारी असून तुला तुरुंगात खडी फोडायला पाठवू अशा प्रकारच्या धमक्या देताना दिसत आहेत. तसेच सदर महिला तरुणाला म्हणाली, “मी एक महिला आहे, मी १०० चुका केल्या तरी मी अडकणार (कायद्याच्या कचाट्यात) नाही. मात्र तू पुरूष आहेस तूच अडकशील. पोलीस तुलाच अटक करतील”.
पार्किंगवरून एक महिला व तिची मुलगी तरुणाबरोबर भांडत असून तरुणाने मात्र त्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला. या व्हिडीओमध्ये तरूण स्वतःची बाजू मांडत असल्याचं आणि त्या दोघींची वाहन पार्क करताना नेमकी काय चूक झाली ते सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. या महिलेने कार चुकीच्या पद्धतीने पार्क केली होती. त्यावर तरुणाने आक्षेप घेतला. मात्र, या मायलेकी संतापल्या व त्या तरुणाला शिवीगाळ करू लागल्या. यावर त्या दोघी म्हणाल्या, आम्ही चूक केली असेल तर त्याने प्रेमाने सांगायला हवं होतं. तो आम्हाला उलट-सुलट बोलतोय. ज्या तरुणाबरोबर या मायलेकीचं भांडण झालं तो तरुण भांडणाचा व्हिडीओ चित्रीत करत आहे. तर तरुणी त्याला शिवीगाळ करताना दिसत आहे. तसेच तुला जे काय करायचं असेल ते कर असं आव्हान देताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
दुसऱ्या बाजूला सदर महिला तरुणाला म्हणाली की “महिलेशी चुकीच्या पद्धतीने बोलशील तर तूच आत (तुरुंगात) जाशील. माझ्या १०० चुका असल्या तरी तुझी चूक आधी आहे. माझी मुलगी आयपीएस अधिकारी आहे”. त्यानंतर तिला वारंवार विचारण्यात आलं की तुझ्या आयपीएस अधिकारी असलेल्या मुलीचं नाव काय? मात्र तिने आपल्या मुलीचं नाव सांगण्यास नकार दिला. भांडण व शिवीगाळ अधिक तीव्र झाल्यानंतर आसपास उभ्या लोकांनी मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा व्हिडीओ दिल्लीतल्या नेमक्या कोणत्या भागातला आहे ते समजू शकलेलं नाही. तसेच पार्किंगवरून भांडण झालं असलं तरी चूक नेमकी कोणाची होती ते समजलेलं नाही.