Delhi Murder Case : देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबार, जाळपोळ, हाणामारी, खून, दरोडा अशा अनेक घटना घडतात. आता दिल्लीत देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीमधील विवेक विहार परिसरातील एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

एका फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचा एक फोन पोलिसांना आला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता एका महिलेचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून बेड बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणात एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सांगण्यात येत आहे. इंडिया टुडेनेच्या हवाल्याने फायनान्शिअल एक्स्प्रेसने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

वृत्तानुसार, या प्रकरणात संबंधित फ्लॅटचा मालक विवेकानंद मिश्राला पोलिसांनी अटक केलं आहे. तसेच या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं वय ५० ते ६० वर्षांच्या दरम्यान आहे. तसेच ज्या महिलेचा मृतदेह आढळून आला, त्या महिलेचे वय ३० ते ५० या दरम्यान असण्याचा अंदाज आहे. माहितीनुसार तिचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असावा. तसेच मिश्रा गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी या फ्लॅटवर भेट देण्यासाठी आल्याचा संशय आहे.

दरम्यान, या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हे घर बाहेरून बंद होते. तसेच घराच्या मागच्या दाराशी रक्ताचे डाग आढळून आल्याचे तपासात समोर आलं आहे. या घटनेच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून नमुने गोळा करत असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.