राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत आज भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी साडेपाचच्या सुमारास दिल्लीकर साखरझोपेत असतानाच ४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के जोरदार जाणवल्याने दिल्लीकरांनी घराबाहेर पळापळ केली. या भूकंपाचं केंद्रीय धौला कुआँ येथील झील पार्क परिसरात होतं. या भूकंपानंतर दिल्लीत मिम्सचा पाऊस पडला आहे.

भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना शांत राहण्याचे, सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आणि “संभाव्य आफ्टरशॉक” साठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसंच, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचीही माहिती त्यांनी एक्सद्वारे दिली. दिल्लीत सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असून भूंकपाच्या दृष्टीने सक्रिय क्षेत्रांच्या झोन चारमध्ये दिल्लीचा समावेश आहे. ही श्रेणी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च श्रेणी आहे. गेल्या काही वर्षांत दिल्लीत ४ रिश्टर स्केलचे अनेक भूकंप झाले. २०२२ मध्ये दिल्लीच्या शेजारील हरियाणा राज्यात ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. हासुद्धा उथळ भूकंप होता. युएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार गेल्या १० वर्षांत दिल्लीत ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा भूंकप नोंदवला गेला नाही.

दरम्यान भूकंपानंतर अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मिम्स शेअर केले आहेत. जे पाहून तुम्हीही लोटपोट व्हाल.

दिल्लीला सातत्याने भूकंपाचे धक्के

हिमालय, अफगाणिस्तान किंवा चीनमध्ये उद्भवणाऱ्या भूकंपांसह दूरवरच्या भूकंपांचेही वारंवार धक्के दिल्लीला जाणवतात. पृथ्वीच्या आत खोलवर – पृष्ठभागाच्या १०० किमी किंवा त्याहून अधिक खाली – उद्भवणारे भूकंप लांब अंतरापर्यंत जाऊ शकतात. परंतु, मूळ स्थानापासून जितके जास्त अंतर असेल तितके नुकसान होण्याची शक्यता कमी असते कारण भूकंप प्रवास करताना वेगाने ऊर्जा गमावतात आणि कमकुवत होतात.

Story img Loader