Delhi : देशभरातील काही राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. आता दिल्लीत देखील वादळाचा तडाखा बसला आहे. दिल्लीत शुक्रवारी सायंकाळी दिल्लीचे हवामान अचानक बदललं आणि दिल्लीसह एनसीआर भागात मोठ्या प्रमाणात धुळीचं वादळ आलं. या वादळामुळे दिल्लीतील अनेक ठिकाणची झाडे पडली असल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच खराब हवामानाचा परिणाम विमानांच्या उड्डाणांवर देखील होत असल्याचं सांगितलं जात आहे.

राजधानी दिल्लीत धुळीचे वादळ आल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १५ विमानांची उड्डाणे वळवण्यात आले आहेत. इंडिगो कंपनीने यासंदर्भात म्हटलं आहे की, “दिल्ली आणि जयपूरमध्ये धुळीचे वादळ आहे. ज्यामुळे उड्डाण आणि लँडिंगवर परिणाम होत आहे. त्यामुळे हवाई वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानांच्या उड्डाणामध्ये विलंब होऊ शकतो, किंवा काही विमानांचे मार्ग बदलण्याची शक्यता आहे”, असं म्हटलं आहे.

भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये हलका ते मध्यम पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीनुसार, आयजीआय विमानतळावर ७४ किमी प्रतितास आणि सफदरजंग विमानतळावर ५६ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे, तर नवी दिल्लीत सुमारे ८५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

वादळामुळे तीन जण जखमी

दिल्लीतील धुळीच्या वादळानंतर चंदर विहार परिसरातील एका घराच्या छतावरून काही बांधकाम साहित्य पडल्याने तीन जण जखमी झाल्याची माहिती दिल्ली अग्निशामक विभागाने दिली आहे. डीएफएसला संध्याकाळी ७.२७ वाजता घटनेची माहिती देण्यासंदर्भात एक फोन आला आणि त्यानंतर घटनास्थळी तीन पथके पाठवण्यात आले. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, धुळीच्या वादळामुळे आणि पावसामुळे दिल्लीतील उष्णता काहीशी कमी झाली आहे. राजधानीत कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेलं आहे. गेल्या २४ तासांत दिल्ली/एनसीआरमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे आणि कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे, असं आयएमडी बुलेटिनमध्ये म्हटलं आहे. दिल्लीच्या बहुतेक भागात अल्प प्रमाणात पाऊस पडला.