BJP Delhi CM Announcement Updates:नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करत तब्बल २७ वर्षांनी सत्तेत पुनरागमन केले आहे. त्यानंतर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांबद्दलचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टी त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत विधिमंडळ बैठक घेणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत. दरम्यान, दिल्लीच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या, २० फेब्रुवारी रोजी दुपारी होईल अशी अपेक्षा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी समारंभ गुरुवारी (२० फेब्रुवारी) रामलीला मैदानावर होणार आहे. २५,००० ते ३०,००० हून अधिक लोक या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याव्यतिरिक्त, भाजपाचे खासदार तसेच एनडीएचे वरिष्ठ नेते देखील उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
Delhi CM: रेखा गुप्ता यांनी केला सरकार स्थापनेचा दावा
दिल्ली विधानसभेतील भाजपा विधिमंडळाच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी उपराज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्या उद्या रामलीला मैदानावर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Delhi CM Rekha Gupta: मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांची प्रतिक्रिया
“माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल मी सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार मानते. तुमच्या विश्वासाने आणि पाठिंब्याने मला नवीन ऊर्जा आणि प्रेरणा दिली आहे. मी प्रतिज्ञा करते की मी दिल्लीतील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी, सक्षमीकरणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी पूर्ण प्रामाणिकपणा, सचोटी आणि समर्पणाने काम करेन. दिल्लीला नवीन उंचीवर नेण्याच्या या महत्त्वपूर्ण संधीसाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे”, मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रेखा गुप्ता यांनी एक्सवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Rekha Gupta: नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे केजरीवाल यांच्याकडून अभिनंदन
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, “रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. मला आशा आहे की त्या दिल्लीच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करतील. दिल्लीच्या जनतेच्या विकास आणि कल्याणासाठी आम्ही त्यांना प्रत्येक कामात पाठिंबा देऊ.”
दिल्ली भाजपा विधिमंडळ पक्षाने रेखा गुप्ता यांची नेतेपदी निवड केली आहे, त्यामुळे आता त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेखा वर्मा भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी दाखल
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांच्या नावाची सध्या होत आहे, त्या आमदार रेखा वर्मा भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी दाखल झाल्या आहेत.
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार प्रवेश वर्मा, पक्ष कार्यालयात रवाना
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भाजपाचे आमदार प्रवेश वर्मा, दिल्लीचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पक्ष कार्यालयात रवाना झाले आहेत.
दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा निर्णय काही वेळातच होणार आहे. यासाठी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक आज (१९ फेब्रुवारी २०२५) दिल्लीत सुरू झाली आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात जास्त चर्चेत असलेली दोन नावे म्हणजे रेखा गुप्ता आणि परवेश वर्मा. दोघेही भाजपचे ताकदवान नेते आहेत आणि अशी चर्चा आहे की, भारतीय जनता पार्टी दिल्लीचे सिंहासन एका महिलेकडे सोपवू शकते. पण दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र परवेश वर्मा हे देखील या शर्यतीत पुढे आहेत. दरम्यान २० फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे.
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव रात्री आठ वाजेपर्यंत जाहीर होणार, भाजपा अध्यक्षांची माहिती
दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. “रात्री ८ वाजेपर्यंत, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री कोण होणार याची माहिती देऊ”, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
Delhi CM Announcement: भाजपाच्या दिल्ली कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष, मुख्यमंत्र्यांचे नाव लवकरच होणार जाहीर
दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव काही वेळातच जाहीर होणार असून, त्यापूर्वी भाजपा कार्यालयाबाहेर उत्साहाचे वातावरण आहे. कार्यलयाबाहेर जमलेले कार्यकर्त्ये ढोल वाजवत जल्लोष साजरा करत आहे.
Delhi CM Announcement: दिल्लीच्या मुख्यमंत्री निवडीसाठी संध्याकाळी ७ वाजता भाजपा विधिमंडळाची बैठक
दिल्लीच्या मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपा विधिमंडळाची बैठक आज संध्याकाळी ७ वाजता पंत मार्गावरील पक्ष मुख्यालयात होणार. याबाबत दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी माहिती दिली आहे.
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी भाजपावर दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी विलंब करत असल्याची टीका केली. माध्यमांशी बोलताना सिसोदिया म्हणाले, “हे विचित्र आहे की, इतके दिवस उलटून गेले आहेत आणि त्यांनी अद्याप नेता (मुख्यमंत्रीपाचा चेहरा) निवडलेला नाही. त्यांना त्यांच्या आमदारांवर विश्वास आहे की नाही. इतका महत्त्वाचा निर्णय घेण्यास झालेला विलंब गोंधळात टाकणारा आहे.”
दिल्लीचे नवे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या सकाळी रामलीला मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार असून, दुपारी १२.३५ वाजता उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला शपथ देतील. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि एनडीएचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी भाजपाने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाला मोठी गर्दी अपेक्षित असून सुमारे ४० सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
दिल्ली विधानसभेच्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाच्या निवडीसाठी भाजपा खासदार रविशंकर प्रसाद आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव ओम प्रकाश धनकर यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
BJP MP Ravi Shankar Prasad and party's national secretary Om Prakash Dhankar appointed as central observers for electing Leader of Delhi #BJP Legislature Party#DelhiElectionResults pic.twitter.com/8pEZn1cBy2
— DD News (@DDNewslive) February 19, 2025
दिल्लीत सरकार स्थापनेसाठी निरीक्षकांच्या नियुक्तीसाठी भाजप संसदीय मंडळाची बैठक सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सर्वानंद सोनोवाल आणि राष्ट्रीय सरचिटणीस संघटन बीएल संतोष यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित आहेत.