Delhi New CM Atishi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली. त्यामुळे दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच मुख्यमंत्रि‍पदासाठी अनेकांची नावेही चर्चेत होती. मात्र, अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांची आम आदमी पार्टीने एकमताने निवड केली. या निवडीनंतर अरविंद केजरीवाल यांनी आज (१७ सप्टेंबर) मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा उपराज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. आता पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आतिशी मार्लेना या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम आदमी पक्षाने एकमताने दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड केल्यानंतर आतिशी मार्लेना यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे आभार मानले आहेत. तसेच एवढी मोठी जबाबदारी पक्षाने सोपवल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. “अरविंद केजरीवाल यांनी ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. याचा मला आनंद आहे, पण दु:ख देखील आहे, कारण केजरीवाल हे त्यांच्या पदाचा राजीनामा देत आहेत. पण दिल्लीचे एकच मुख्यमंत्री आहेत, ते म्हणजे अरविंद केजरीवाल”, असं आतिशी मार्लेना यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी

आतिशी मार्लेना काय म्हणाल्या?

“मी सर्वात आधी दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आप आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तसेच माझे गुरू अरविंद केजरीवाल यांचे आभार मानते. त्यांनी मला इतकी मोठी जबाबदारी दिली आणि त्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवला. हे फक्त ‘आप’ मध्येच होऊ शकतं. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली आहे. कदाचित मला निवडणुकीचे तिकीटही मिळाले नसते. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला आमदार, मंत्री बनवलं आणि माझ्यावर अरविंद केजरीवाल यांनी आता ही मोठी जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. याचा मला आनंद आहे. पण मी दु:खी देखील आहे, कारण दिल्लीचे मुख्यमंत्री आणि माझे मोठे भाऊ अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पदाचा राजीनामा देत आहेत. आज सर्व आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्लीच्या दोन कोटी जनतेच्यावतीने मी सांगू इच्छिते की दिल्लीचे एकच मुख्यमंत्री आहेत, ते म्हणजे अरविंद केजरीवाल”, अशी प्रतिक्रिया आतिशी यांनी दिली आहे.

कोण आहेत आतिशी मार्लेना?

आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरिष्ठ नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. सध्याच्या आम आदमी पार्टीतील बहुसंख्य नेते हे त्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्याचदरम्यान, आतिशी या केजरीवाल व इतर नेत्यांच्या संपर्कात आल्या. पुढे त्यांनी आम आदमी पार्टीद्वारे राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या दिल्लीतल्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी दिल्लीच्या शिक्षण मंत्रालयासह, सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री म्हणून देखील काम केलं आहे. त्या आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्य देखील आहेत.

अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे त्यांनी राजीनामा सूपूर्द केला आहे. आता लवकरच आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi new cm atishi marlenas first reaction after being elected chief minister of delhi gkt