Raja Iqbal Singh : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिल्लीची सत्ता काबीज करत ‘आप’ला धक्का दिला होता. एवढंच नाही तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह ‘आप’च्या अनेक मोठ्या नेत्यांनाही पराभवाला समोरं जावं लागलं. दरम्यान, यानंतर आता दिल्ली महापालिकेच्या महापौरपदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीतून आम आदमी पक्षाने माघार घेतली होती, त्यामुळे भाजपाचा मार्ग मोकळा झाला होता.
भारतीय जनता पक्षाने महापौरपदासाठी सरदार राजा इकबाल सिंह यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता राजा इकबाल सिंह हे दिल्लीचे नवे महापौर झाले आहेत. त्यामुळे दिल्ली विधानसभेनंतर आता महापालिकेतही कमळ फुललं असून आम आदमी पक्षाच्या हातातून दिल्लीची सत्ता गेल्यानंतर आता दिल्ली महानगरपालिकाही ‘आप’च्या हातातून गेली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
आम आदमी पक्षाने दिल्ली महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजपाचा मार्ग सोपा झाला होता. तसेच काँग्रेसचे नगरसेवक कमी असल्यामुळे महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीतून आरामात विजय मिळण्याची अपेक्षा भाजपाला होतीच आणि तसं झालंही. त्यामुळे आता दिल्लीत भाजपाचं ‘ट्रिपल इंजीन’ सरकार असणार आहे.
राजा इक्बाल सिंह यांची पहिली प्रतिक्रिया काय?
दिल्ली महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर राजा इक्बाल सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “दिल्लीतील स्वच्छता व्यवस्था सुधारणे, कचऱ्याचे डोंगर हटवणे, पाणी साचण्याची समस्या सोडवणे आणि दिल्लीतील लोकांना सर्व मूलभूत आणि आवश्यक सुविधा पुरवणे हे मुख्य ध्येय असेल. आपण सर्वजण पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने एकत्र काम करू”, असं राजा इक्बाल सिंह यांनी म्हटलं आहे.