पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘काही वर्षांपूर्वी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक मानले जात होते. परंतु नव्या अहवालानुसार आशियातील दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी आठ शहरे भारतातील आहेत. परंतु या यादीत दिल्लीचा समावेश नाही,’’ असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला.
मुख्यमंत्र्यांनी ‘ट्विटर’वर यासंदर्भातील प्रसारमाध्यमांचे वृत्तांकन प्रसृत केले. त्यात या अहवालाचा संदर्भ देत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे, की दिल्लीने अद्याप प्रदूषणाविरुद्धची लढाई जिंकली नसली तरीही दिल्लीला आता जगातील सर्वात प्रदूषित शहर मानले जात नाही ही उत्साहवर्धक बाब आहे. काही जण विचारत आहेत, की आपण प्रदूषणाविरुद्धची लढाई जिंकली आहे का? मी समाधानी आहे का? अजिबात नाही. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आम्ही योग्य मार्गावर आहोत. दिल्लीला जगातील सर्वात स्वच्छ शहर बनवायचे आमचे ध्येय आहे. दिल्लीवासीय कठोर परिश्रम करतात. आम्ही कठोर परिश्रम करत राहू, जेणेकरून दिल्लीस जगातील सर्वोत्तम शहरांत स्थान मिळू शकेल. आम्ही दिल्लीला जगातील सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.