देशाच्या अनेक भागांमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता गंभीरपणे जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होऊ लागली आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन बाधितांचा आकडा देखील चिंताजनकरीत्या वाढू लागला आहे. राजधानी दिल्लीमध्ये करोनानं गंभीर रुप धारण केलं असून पॉझिटिव्हिटी रेट तब्बल २५ टक्क्यांवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर आता दिल्ली सरकारनं मोठा निर्णय घेतला असून दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये आणि हॉटेल-रेस्टॉरंट्ससाठी हा निर्णय लागू असणार असल्याचं दिल्ली सरकारने जारी केलेल्या नव्या करोना नियमावलीमध्ये नमूद केलं आहे.
सोमवारी दिल्लीच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीतील करोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आता २५ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. सोमवारी दिल्लीत २४ तासांत १९ हजार १६६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यासोबतच १७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि दिल्लीचं प्रशासन सतर्क झालं असून नव्याने नियमावली जारी करण्यात आली आहे.
सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश!
दिल्ली सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार दिल्लीतील सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील सर्व खासगी कार्यालयांना टाळं ठोकण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या नियमामधून फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या खासगी कार्यालयांनाच वगळण्यात आलं आहे. आत्तापर्यंत दिल्ली सरकारने या कार्यालयांना ५० टक्के कर्मचारी क्षमतेनं कामकाज करण्याची परवानगी दिली होती. तसेच, या कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सक्ती करण्यात आली होती. आता मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कार्यालये बंद करण्याचे निर्देश दिल्ली सरकारने दिले आहेत.
हॉटेल्स, रेस्टॉरंट्सही बंद
दरम्यान, एकीकडे खासगी कार्यालयांना टाळं ठोकण्याचे निर्देश दिले असताना दिल्लीतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्स देखील बंद करण्याचे आदेश दिल्ली सरकारने काढले आहेत. याआधी हॉटेल्सला देखील ५० टक्के आसन क्षमतेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली होती. आता मात्र, दिल्लीतील हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद करण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये फक्त होम डिलीव्हरी आणि पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, तिथे बसून जेवता येणार नाही.
आत्तापर्यंत दिल्लीतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला ५० टक्के क्षमतेनं सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत मुभा देण्यात आली होती. तसेच, बार देखील दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहात होते.