नोटाबंदीच्या निर्णयानंतर सातत्याने लुटीच्या, चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पांडव नगर येथून एक कॅश व्हॅन लुटण्यात आली. व्हॅन लुटल्यानंतर चोरटे तेथून पसार झाले. त्याचदरम्यान पोलिसांचा तपास सुरू होताच. नव्या २ हजारांच्या नोटांमध्ये चिप असल्याच्या भितीने चोरट्यांनी हे पैसेच खर्च केले नाहीत. दिल्लीत परतताच पोलिसांनी या तिघांना ९.५ लाखांसह अटक केली.

दि. १९ डिसेंबर रोजी संशयित आरोपी बिट्टू, रोहित नागर आणि सनी शर्मा यांनी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जात असलेली एक कॅश व्हॅन लुटली होती. ही व्हॅन लुटल्यानंतर तिन्ही संशयित हरिद्वारला गेले होते. परंतु नव्या नोटेत चिप असल्याच्या भितीने त्यांनी ते पैसे खर्च केले नाहीत. त्यानंतर ते पुन्हा दिल्लीत परतल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नव्या २ हजारांच्या नोटात चिप नसल्याची पूर्वीच स्पष्ट केले आहे.
बिट्टू हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. ही व्हॅन लुटण्यासाठी त्यानेच योजना बनवली होती. यासाठी त्याने रोहित आणि सनीलाही सामील करून घेतले. या सर्वांनी प्रथम अनेक दिवस विविध ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या व्हॅनवर लक्ष ठेवले. त्यानंतर त्यांनी पांडवर नगर येथे एक कॅश व्हॅन लुटली. या घटनेत तिघांनी एका बाइकचा वापर केला होता. परंतु ती बाईकही चोरीची होती. तिची नंबरप्लेट यांनी दिल्लीतील एका भागात बदलली होती.