Delhi Police News : दिल्ली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा चार गुन्हेगारांना अटक केली. काही गुन्हेगारांनी अवैध शस्त्रे बाळगल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी चार गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण कारवाईचा थरारक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १ मार्च रोजी सूत्रांनी दिल्ली पोलिसांच्या बदरपूर उपविभागाला माहिती दिली होती की, दिल्लीत एका कारमध्ये चार संशयित बेकायदेशीर शस्त्रे घेऊन फिरत आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपविभाग बदरपूरचे एक पथक दिल्लीतील नाला रोड, अर्पण विहारजवळील लोहिया पुलावर तैनात करण्यात आले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री १२ वाजता अर्पण विहार येथून एक राखाडी रंगाची कार आली, ज्याला माहिती देणाऱ्याने संशयास्पद वाहन म्हणून ओळखलं. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण गाडीच्या समोरील सीटवर बसलेल्या एका संशयिताने पिस्तूल काढलं. पण तेवढ्यात पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हेगाराच्या गाडीच्या पुढच्या चाकावर गोळीबार केला. त्यानंतर ती गाडी थांबली. वाहन थांबल्यानंतर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली.

यानंतर संबंधित गाडीची झडती घेण्यात आली असता दोन अवैध पिस्तूल, दोन काडतुसे आढळून आले. यानंतर त्या संशयितांना अटक करत पोलिसांनी ती गाडी देखील ताब्यात घेतली. आरोपींनी उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथून शस्त्रे खरेदी केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक आल्याची माहिती देण्यात आली. यासंदर्भातील वृत्त एएनआयच्या हवाल्याने जनसत्ताने दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गुन्हेगार काही मोठे गुन्हे करण्याच्या योजना आखत होते. यामध्ये निशांत नगर उर्फ ​​निशू (२९,रा.हसनपूर, आयपी एक्स्टेंशन पटपरगंज), विकी गुजर (२७,रा.भोपुरा, गाझियाबाद) आणि कुणाल उर्फ ​​गोलू (२५,रा.डेअरी फार्म) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Story img Loader