स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणी प्रकरणी अखेर बिभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे. स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी गुरुवारी दिल्ली पोलिसांनी स्वाती मालिवाल यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला होता. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी बिभव कुमार यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भात एएनआयवृत्तसंस्थेशी बोलताना आपच्या लीगल सेलचे प्रमुख संजीव नसियार म्हणाले, दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांना ज्याप्रकारे अटक केली आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे. आम्हाला अद्याप गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत प्रत मिळालेली नाही. त्यामुळे आज सकाळी आम्ही न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर दुपारी चार वाजता निर्णय येणार होता. मात्र, त्यापूर्वी पोलिसांनी बिभव कुमार यांना अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, १३ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मला मारहाण करण्यात आली, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला होता. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे स्वीय साहायक बिभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या पथकाने स्वाती मालिवाल यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाबही नोंदवला होता. त्यावेळी स्वाती मालिवाल यांनी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली होती. तत्पूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमार यांना समन्स बजावले होते. यानुसार बिभव कुमार यांना १७ मे रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले होते. तसेच दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता.

हेही वाचा – VIDEO : “…तर मी तुझी नोकरी खाईन”; मारहाण होण्यापूर्वी स्वाती मालिवाल यांच्याबरोबर काय घडलं?

स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणावर आपची भूमिका काय?

या प्रकरणावर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. “ही घटना अत्यंत निंदनीय आहे. अरविंद केजरीवाल यांना भेटायला स्वाती मालिवाल गेल्या होत्या. त्या जेव्हा केजरीवाल यांची वाट बघत होत्या तेव्हा बिभव कुमार यांनी त्यांच्याशी गैरव्यवहार केला आणि कथित मारहाणही केली. या सगळ्या घटनेनंतर आता स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणात लेखी तक्रार दिली आहे. दिल्ली पोलिसांचं पथक स्वाती मालिवाल यांच्या घरी गेलं होतं तिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.” असे ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi police arrests bibhav kumar in connection with swati maliwal assault case spb