दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सुल्ली डिल्स अॅप प्रकरणात पहिली अटक केली आहे. हे अॅप बनवणाऱ्या ओंकारेश्वर ठाकूरला दिल्ली पोलिसांनी मध्य प्रदेशमधील इंदोरमधून अटक केली आहे. बुली बाई अॅप प्रकरणातील मास्टरमाइंड असणाऱ्या निरज बिष्णोईला अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीनंतर ओंकारेश्वर ठाकूरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील आयएफएसओ (Intelligence Fusion and Strategic Operations) युनिटने ही कारवाई केली.
२५ वर्षीय आरोपी ओंकारेश्वर ठाकूरने आपण जुलै २०२१ मध्ये सुल्ली डिल्स अॅप तयार केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं आहे. सुल्ली डिल्स अॅपवर मुस्लिम महिलांच्या परवानगीविना लिलावासाठी त्यांच्या फोटोंचा वापर करण्यात आला होता. बीसीएचं शिक्षण घेतलेल्या ओंकारेश्वर ठाकूरने यामध्ये अजून काही लोक सहभागी असल्याचं म्हटलं आहे. जुलै २०२१ मध्ये दिल्ली पोलिसांनी सुल्ली डिल्स अॅप प्रकरणी पहिला गुन्हा दाखल केला होता.
Bulli Bai App: मुस्लिम महिलांचे फोटो टाकत लिलाव करणारं हे प्रकरण नेमकं काय आहे?
दरम्यान दिल्ली पोलिसांनी ६ जानेवारीला बुली बाई अॅप तयार करणाऱ्या निरज बिष्णोईला अटक केली. सुल्ली डिल्स अॅपप्रमाणे त्यानेही मुस्लिम महिलांचे फोटो वापरत त्यांचा लिलाव करत होता.
तपासादरम्यान निरज बिष्णोई हा @sullideals या ट्विटर हँडलच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. GitHub वर सुल्ली डिल्स अॅप तयार करताना या अकाऊंटचा वापर झाला होता. दरम्यान बुली बाई अॅप प्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. श्वेता सिंह (१८), मयाक रावल (२१) आणि विशाल कुमार झा (२१) अशी या आरोपींची नावं आहेत.