जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याच्यावर १७ फेब्रुवारी रोजी पतियाळा न्यायालयाच्या आवारात करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) शनिवारी समोर आली. वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात येत असलेल्या या व्हिडिओत कन्हैया सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावर हल्ल्यासंदर्भात वकिलांना माहिती देताना दिसत आहे. मी हल्लेखोराची ओळख पटवूनही दिल्ली पोलिसांनी त्याला अटक न केल्याचा आरोपही कन्हैयाने या व्हिडिओत केला आहे.
मी प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर लगेचच वकिलांच्या एका गटाने माझ्यावर हल्ला केला. हे सगळे पूर्वनियोजित असल्याचे वाटत होते, कारण मला मारणारे लोक इतरांनाही तसेच करायला सांगत होते. आम्ही न्यायालयात प्रवेश केला त्याठिकाणी एक मशिन होते. त्यांनी मला या मशिनवर ढकलले तेव्हा माझी पँट जवळपास निघाली आणि मला दुखापत झाली. ते सर्वजण मिळून माझ्या पोटात गुद्दे मारत होते. ते एकामागोमाग एक असे मला मारत होते, असे कन्हैया वकिलांना सांगताना दिसत आहे. या झटापटीत माझ्या अंगावरचे जवळपास सर्व कपडे निघाले होते, असेदेखील त्याने सांगितले. यानंतर मला न्यायालयातील एका कक्षात नेले असताना त्या जमावापैकी एक व्यक्ती माझ्या पाठीमागे येऊन बसली. मी माझ्याबरोबरच्या पोलिस कर्मचाऱ्याला याबद्दल सांगितले. पोलिसांनी ज्यावेळी त्याच्याकडे ओळखपत्र मागितले तेव्हा त्याने उलट पोलिस कर्मचाऱ्यालाच त्याचे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. माझ्यावर हल्ला करणारी हीच व्यक्ती आहे, हे मी पोलिसांना वारंवार सांगूनही त्यांनी त्याला अटक केली नसल्याचे कन्हैयाने या व्हिडिओत म्हटले आहे.

Story img Loader