दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला भालसवा येथील एका नाल्यात तीन तुकडे केलेला मृतदेह आढळला आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र या घनटेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी नुकतेच ५६ वर्षीय नौशाद आणि २९ वर्षीय जगजित सिंह यांना यूएपीए कायद्यांतर्गत अटक केली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशयावरून पोलिसांनी ही कारवाई केली. या आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापेमारी केली. याच घराच्या परिसरात हा मृतदेह आढळला आहे.
हेही वाचा >>> भारत जोडो यात्रेत मृत्यू झालेल्या खासदार संतोख सिंह यांच्या मुलाचे पंजाब सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले “माझ्या वडीलांचा मृत्यू…”
तीन बंदुका, २२ काडतुसे जप्त
दिल्ली पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केल्यानंतर ते वास्तव्यास असलेल्या घरावर छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांना तीन बंदुका, २२ काडतुसे जप्त केली आहेत. या आरोपींवर टार्गेटेड किलिंगचा आरोप असून त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छापेमारीदरम्यान पोलिसांना काही रक्ताचे डागदेखील आढळले आहेत. त्यानंतर याच भागात पोलिसांना हा तीन तुकडे केलेला मृतदेह आढळला आहे.
घरात आढळले रक्ताचे डाग
आरोपी जगजित आणि नौशाद यांनी छापेमारी केलेल्या घरात खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच खुनाची कृती त्यांनी रेकॉर्ड केल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या घराच्या आसपास तीन तुकडे केलेला मृतदेह आढळल्यामुळे पोलिसांचा हा संशय आणखी बळावला आहे.
हेही वाचा >>> राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पाया पडत होती महिला इंजिनीअर, तेवढ्यात…
दरम्यान, भालसवा या भागात आढळलेला मृतदेह आणि यूएपीए कायद्यांतर्गत अटक केलेले दोन आरोपी यांच्यात काय संबंध आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.