दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान एक उल्लेख केला होता. त्या प्रकरणाची दिल्ली पोलिसांनी दखल घेतली आहे. त्याच प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. ANI या वृत्तसंस्थेने या संबंधीचे वृत्त दिले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या विदेश दौऱ्यात नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यावरून आज संसदेत गदारोळ झाला. तसंच राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी आपण संसदेत याचं उत्तर देऊ असं म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना का बजावली नोटीस?
दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी या नोटीसद्वारे राहुल गांधींना हे सांगितलं आहे की तुम्ही आम्हाला त्या पीडित लोकांचे तपशील द्यावेत ज्यांचं लैंगिक शोषण, बलात्कार झाल्याचा उल्लेख तुम्ही केला होतात. सोशल मीडियाच्या पोस्टच्या आधारे आम्हाला ही माहिती मिळाली आहे. तुम्ही या पीडित व्यक्तींचे तपशील द्या असं दिल्ली पोलिसांनी नोटिशीत म्हटलं आहे. सोशल मीडियावरच्या पोस्टची दखल पोलिसांनी घेतली आहे आणि ही नोटीस बजावली आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान काय म्हटलं होतं?
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान श्रीनगरमध्ये एक उल्लेख केला होता. ते म्हणाले होते एका मुलीशी बोललो. त्या मुलीने मला हे सांगितलं की तिच्यावर बलात्कार झाला आहे. मी तिला म्हटलं की तू पोलिसांकडे जा किंवा मी पोलिसांशी बोलतो. त्यावर ती म्हणाली तुम्ही असे करू नका मला लाज वाटते आहे. हे वक्तव्य राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान केलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीचे तपशील आम्हाला द्या असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.