नवी दिल्ली : महिला कुस्तीगीरांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात तपासाला वेग आला आहे. आरोप करणाऱ्या एका महिला कुस्तीगीरासह दिल्ली पोलीस दुपारी दीडच्या सुमाराला सिंह यांच्या कार्यालयात गेले आणि तिथे लैंगिक छळाचा घटनाक्रम उभा केला. कुस्ती महासंघाचे कार्यालय हे ब्रिजभूषण सिंह यांच्या सरकारी निवासस्थानातच आहे.
दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि कुस्तीगीर साधारण अर्धा तास घटनास्थळी होते. यावेळी पोलिसांनी महिला कुस्तीगीराला लैंगिक छळ कसा आणि कुठे झाला त्याची माहिती द्यायला सांगितले.
मात्र यानंतर, कुस्तीगीर तडजोड करण्यासाठी ब्रिजभूषण यांच्या निवासस्थानी गेली होती असे वृत्त पसरले. विनेश फोगटने ते खोडून काढले. ट्वीट करून तिने आपली नाराजी व्यक्त केली. महिला कुस्तीगीर पोलीस तपासासाठी घटनाक्रम सांगण्यासाठी गेली होती. पण माध्यमांनी चुकीचे वृत्त दिले असे ट्विट तिने केले. बजरंग पुनियानेही ट्विट करून याबद्दल नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणात १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल होईल असे आश्वासन क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी दिल्यानंतर कुस्तीगीरांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकानेही पुढील आठवडय़ापर्यंत दोन प्रकरणांमध्ये न्यायालयात तपास अहवाल सादर केला जाईल असे सांगितले.
‘जंतर-मंतरवर द्वेषपूर्ण भाषणे नाहीत!’
कुस्तीगीरांच्या जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान कोणतीही द्वेषपूर्ण भाषणे झाल्याचे आढळले नाही असे दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयाला सांगितले. याबद्दल तक्रार करणाऱ्या व्यक्तीने पेन-ड्राइव्हमधून व्हिडिओ पुराव्यादाखल सादर केला होता. मात्र, त्यामध्ये कोणत्याही द्वेषपूर्ण घोषणा आढळल्या नाहीत असे पोलिसांच्या कृती अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
ही ब्रिजभूषण सिंह यांची ताकद आहे. ते बाहूबळ, राजकीय सत्ता आणि खोटे वृत्त पसरवून महिला कुस्तीगीरांचा छळ करत आहेत आणि त्यांना अटक होणे आवश्यक आहे. जर पोलिसांनी आमचे आंदोलन मोडून काढण्याऐवजी त्यांना अटक केली तर न्याय मिळण्याची काही आशा आहे, अन्यथा नाही.
– विनेश फोगट, आंदोलनकर्ती कुस्तीगीर