भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा दिल्ली पोलीस ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करणे आणि त्यांच्या अटकेची मागणी करत रविवारपासून आघाडीचे कुस्तीगीर पुन्हा आंदोलन करत आहेत. तसेच, सोमवारी ( २४ एप्रिल ) कुस्तीगीर विनेश फोगाटसह अन्य ६ जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत ब्रिजभूषण सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती.
यावर आज ( २८ एप्रिल ) सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायाधीश पी.एस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा “दिल्ली पोलिसांकडून आजच ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल,” अशी माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.
याप्रकरणावर कुस्तीगीर विनेश फोगाटने बोलताना सांगितलं की, “पहिल्या दिवशीच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. पण, त्यासाठी सहा दिवस लागले. ही लढाई गुन्हा दाखल करण्यापूर्ती मर्यादित नाही. त्यांच्याविरोधात आधीच ८५ गुन्हे दाखल आहेत. पण, त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मग, आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने, त्यांना काही फरक पडणार नाही. त्यांना सर्व पदांवरून हटवत, तुरुंगात टाकलं पाहिजे. यांसारख्या लोकांपासून आम्हाला कुस्तीला वाचवायचं आहे,” असेही विनेश फोगाट म्हणाली.