ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू सुशील कुमार कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत आहे. दरम्यान, त्याला शुक्रवारी मंडोली जेलमधून तिहार येथे हलविण्यात आले. या दरम्यान पोलीस आरोपी सुशील कुमार सोबत फोटो काढताना दिसले. फोटो काढताना सुशील कुमार हसतांना दिसला. फोटोत दिल्ली पोलीस आणि कैद्यांच्या संरक्षणासाठी तैनात केलेले सुरक्षा कर्मचारी शस्त्रास्त्रांसह दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या वागणूकीवर प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. तसेच सुशीलला तुरूंगात विशेष वागणूक दिली जात आहे का?, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
सुशील कुमारच्या न्यायालयीन कोठडीत ९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सुशीलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी महानगर दंडाधिकारी मयांक अग्रवाल यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्याच्यावर हत्या आणि अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार त्याला मंडोली कारागृहातून तिहारच्या जेल क्रमांक २ मध्ये पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा- सुशील कुमारने हत्या केलेल्या ‘त्या’ रात्रीचा व्हिडीओ आला समोर; अमानुषपणे मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद
नेमकं काय झालं होतं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सागर धनखड आणि त्याच्या दोन मित्रांना ४ मे रोजी राजधानी दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअममध्ये बेदम मारहाण केली होती. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सागर धनखडचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मालमत्तेवरील अतिक्रमण आणि ताबा सोडण्यासाठीची धमकी याचे पर्यवसान ४ मे रोजी मारहाणीत घडले आणि त्यात सागरची हत्या झाली, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
सुशीलच्या चार साथीदारांना चार दिवसांची पोलीस कोठडी
घटनेनंतर फरार असलेल्या सुशील कुमारवर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. याशिवाय अजय कुमारच्या अटकेसाठी ५० हजारांचं बक्षीस जाहीर झालं होतं. ३७ वर्षीय सुशील कुमारला अटक करण्यासाठी पोलिसांनी दिल्ली तसंच शेजारच्या अनेक राज्यांमध्ये छापे टाकले होते. १८ मे रोजी सुशील कुमारने दिल्ली कोर्टात धाव घेत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. तपास एकतर्फी असून पीडितला झालेल्या दुखापतीशी आपला संबंध नसल्याचा दावा त्याने केला होता. मात्र कोर्टाने प्रथमदर्शी मुख्य आरोपी असून गंभीर आरोप असल्याचं सांगत अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती. नंतर त्याला अटक करण्यात आली.