दिल्लीमध्ये सध्या राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक म्हणजे ‘करो या मरो’ची परिस्थिती आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि भाजपच्या किरण बेदी हे दोन चेहरे सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेस पक्ष या लढतीत असून नसल्यासारखा आहे. अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असलेल्या या निवडणुकीचे भवितव्य या दहा महत्त्वपूर्ण मतदारसंघांवर अवलंबून असेल, असे विश्लेषकांचे मत आहे.

कृष्णा नगर- भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या तर त्यांच्यासाठी पक्ष अत्यंत भरवशाचा मतदारसंघ निवडणार हे साहजिकच होते. त्यादृष्टीने कृष्णानगर हा भाजपचा सर्वाधिक भरवशाचा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. या मतदारसंघात बेदी यांना काँग्रेसच्या बन्सीलाल आणि ‘आप’च्या एस. के. बग्गा यांचे आव्हान असले तरी या ठिकाणी भाजपचा विजय सुलभ मानला जात आहे.

23
नवी दिल्ली-
‘मफलरमॅन’ अशी ओळख असलेले अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघात सातत्याने चर्चेत राहिले आहेत. केजरीवाल यांनी गेल्या वर्षभरात प्रसारमाध्यमांच्या प्रकाशाचा झोत आपल्यावर कसा राहील, याची व्यवस्थित काळजी घेतली आहे. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत केजरीवालांना या ठिकाणी विजय मिळाला होता. यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी मंत्री किरण वालिया यांचे मुख्य आव्हान असेल.

मालवीय नगर- दक्षिण दिल्लीतील या मतदारसंघात ‘आप’चे सोमनाथ भारती आणि काँग्रेसचे योगेंद्रनाथ शास्त्री यांच्यात थेट लढत रंगेल. यापूर्वी मंत्री राहिलेल्या भारती आणि शास्त्री या दोघांचीही मतदारसंघावर चांगली पकड आहे. मागील वर्षी एका स्टिंग ऑपरेशनमुळे सोमनाथ भारती वादात सापडले होते. तरीही या मतदारसंघात त्यांची विशिष्ट अशी व्होटबँक आहे.

ग्रेटर कैलाश- दक्षिण दिल्लीतील शहरी चेहरा असणारा हा मतदारसंघ प्रणब मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. ग्रेटर कैलाश मतदारसंघाचा पद्धतशीर विकास करण्याचे त्यांचे आश्वासन मतदारांना चांगलेच आकर्षित करत आहे. मात्र, आप सरकारमध्ये परिवहन मंत्री राहिलेले सौरभ भारद्वाज यांचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

24
पटेल नगर-
पश्चिम दिल्लीतील पटेल नगरमध्ये दलित आणि झोपडपट्टीवासियांचे मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ या मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या आहेत. यापूर्वी उत्तर-मध्य दिल्ली मतदारसंघातून त्या लोकसभेवरही निवडून गेल्या होत्या. या मतदारसंघात त्यांच्यासमोर ‘आप’च्या हजारी लाल चौहान आणि काँग्रेसचे माजी आमदार राजेश लिलोठिया यांचे आव्हान असेल.

सदर बाजार- दिल्लीतील सर्वात मोठा घाऊक बाजार असलेल्या सदर बाजार मतदारसंघातून काँग्रेसला मोठ्या अपेक्षा आहेत. काँग्रेसच्या निवडणूक यंत्रणेचे प्रमुख अजय माकन सदर बाजारमधून विजयी होतील, याबद्दल पक्ष प्रचंड आशावादी आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या या मतदारसंघात २०१३मध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी माकन यांना ‘आप’चे सोमदत्त शर्मा आणि भाजपच्या प्रवीण जैन यांचे आव्हान असेल.

पतपरगंज- आपच्या मनिष सिसोदिया यांनी या ठिकाणी विजय मिळवेपर्यंत पतपरगंज मतदारसंघ दिल्लीच्या राजकारणात तितकासा प्रसिद्ध नव्हता. अरविंद केजरीवाल यांचे प्रमुख सहकारी आणि आप सरकारमध्ये मंत्री असलेले मनिष सिसोदियांच्या विजयानंतर पतपरगंज खऱ्या अर्थाने चर्चेत आले. यावेळी भाजपने ‘आप’च्याच विनोदकुमार बिन्नी यांना गळाला लावत सिसोदियांची लढाई अवघड केली आहे.

त्रिलोकपुरी- १९८४मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीनंतर दिल्लीतील त्रिलोकपुरी प्रकाशझोतात आले होते. गेल्यावर्षीही या भागात हिंदू- मुस्लिम दंगलीचा भडका उडाला होता. मात्र, पोलीसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण जास्त चिघळले नव्हते. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या मतदारसंघात यावेळी ‘आप’चे राजू धिंगण, भाजपचे किरण वैद्य आणि काँग्रेसचे ब्रम्हा पाल अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

22
जनकपुरी-
एकाच घराण्यातील दोन व्यक्ती एकमेकांविरोधात लढण्याची जुनी परंपरा दिल्लीच्या राजकारणात आहे. यंदा जनकपुरी मतदारसंघातही असेच चित्र पहायला मिळत आहे. सलग सातवेळा विधानसभेवर निवडून गेलेले भाजपचे जगदीश मुखी यांच्यासमोर त्यांचेच जावई सुरेश कुमार यांचे आव्हान आहे. सुरेशकुमार जनकपुरीतून काँग्रेसच्या तिकीटावर लढत आहेत. घराणेशाहीतील या संघर्षामुळे सध्या जनकपुरीतील रस्त्यांवर प्रचार शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे.

द्वारका- पश्चिम दिल्लीतील द्वारका या महत्त्वपूर्ण मतदारसंघातून काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करत आहेत. त्यांच्यासमोर लालबहादूर शास्त्रींचे नातू आदर्श शास्त्रींचे आव्हान असेल. आदर्श शास्त्री ‘आप’च्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.