अरविंद केजरीवाल यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमध्ये अचानक ‘आप’लेपणाची भावना जागृत झाली आहे. उद्या घोषित होणाऱ्या निकालानंतर ही ‘आप’लेपणाची भावना सत्तास्थापनेसाठी कामी येईल, असा भाजप व काँग्रेस नेत्यांचा कयास आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी, भाजपमधील अंतर्गत मतभेद व गांधी कुटुंबीय वगळता काँग्रेसच्या इतर नेत्यांनी दिल्लीकडे दुर्लक्ष केल्याचा लाभ आम आदमी पक्षाला मिळेल, अशी भीती भाजप प्रदेशाध्यक्ष विजय गोयल यांनी मतदानानंतर झालेल्या पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली आहे. त्यामुळे बहुमत न मिळाल्यास आम आदमी पक्षाची मदत घेण्यासाठी गोयल यांनी आत्तापासूनच डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे.
    इकडे अरविंद केजरीवाल यांना एकेरी नावाने हाक मारणारे त्यांचे मित्र खासदार संदीप दीक्षित यांच्यामार्फत काँग्रेसने आम आदमी पक्षाच्या विजयी होण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांना चुचकारण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीनंतर निकालाच्या प्रतीक्षेत भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी शनिवारचा दिवस निवांत घालवला. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन दिवसभर घरीच होते. वेलकम मेट्रो स्टेशनपासून थोडय़ाच अंतरावर असलेल्या हर्षवर्धन यांच्या घरी दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी होती. कर्नाटकमधील एका महाराजांनी आणलेला गंडादोरा हर्षवर्धन यांनी हातावर बांधला. शुक्रवारी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर हर्षवर्धन काहीसे निराश दिसत होते. निकालाच्या आधीच पराभवाची भीती असलेल्या भाजप उमेदवारांनी आपला राग या बैठकीत व्यक्त केला होता. शीला दीक्षित यांचे नियमित कार्यक्रम सुरू होते. शनिवार असल्याने शासकीय कार्यलये बंद होती. दिवसभर त्या घरीच होत्या. प्रसारमाध्यमांना त्यांच्या ६ जनपथवरील निवासस्थानात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांनी दिल्लीत महिला ग्रामीण बँकेचे उद्घाटन केले. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम या कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र उभय नेत्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली नाही. अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी हरयाणातील सोणा येथे गेले होते. शनिवारी रात्री ते कौशांबीतील निवासस्थानी दिल्लीत परतले. प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठी केजरीवाल विपश्यनेला गेले होते.

Story img Loader