पक्षस्थापनेच्या दिवशी बिर्ला मंदिरापासून सुरू झालेल्या झाडूच्या साफसफाईमुळे दिल्लीची सारी समीकरणे बदलली. निवडणूक आयोगाकडून ‘झाडू’ हेच चिन्ह मागून घेणाऱ्या केजरीवाल यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. दिल्लीच्या बाह्य़ भागातील वाल्मिकी (जे प्रामुख्याने सफाई कामगार आहेत), जाटवबहुल (चर्मकार) विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने थोडय़ाथोडक्या नव्हे, तर तब्बल आठ जागा जिंकल्या आहेत.
विशेष म्हणजे सत्तर टक्क्य़ांपेक्षा जास्त मतदान झालेल्या सीमापुरी, सदर बझार व शकुर बस्ती मतदारसंघांतून आम आदमी पक्षाचे उमेदवार निवडून आलेत. पन्नासपेक्षा जास्त, परंतु साठ टक्क्य़ांपेक्षा कमी मतदान झालेल्या पहिल्या सहा मतदारसंघांत भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना थोडय़ाथोडक्या नव्हे, तर २२ हजार मतांनी अस्मान दाखवत दिल्लीकरांनी काँग्रेसविरोधी लाटेत ‘हात’ धुऊन घेतला.
एकूण मतदानापैकी आम आदमी पक्षाला तीस टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला केवळ २५ टक्के मते मिळाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण १५ टक्क्य़ांनी कमी आहे. ३३ टक्के मतांसह सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपची टक्केवारी २००८ च्या तुलनेत ३ टक्क्य़ांनी घटली आहे. पक्षाची स्थापना केल्यानंतर केजरीवाल यांनी परिवर्तनाची हाक दिली. उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांतून एक हजार समर्थक केजरीवाल यांच्यासाठी दिल्लीत ठाण मांडून होते. सत्ताधारी व विरोधकांना धडा शिकवण्यासाठी ‘आम आदमी पक्ष’ सरसावला. दिल्लीत सर्वात बिकट समस्या पाणी व विजेची आहे. ल्युटन्स झोनमध्ये राहणाऱ्यांनादेखील पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. महापालिकेकडून मिळणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने सत्तर रुपये बिसलेरीसाठी मोजावे लागतात. त्यात विजेचे सदोष मीटर दीक्षित सरकारने दिल्लीकरांच्या माथी मारले, असा प्रचार केजरीवाल यांनी सुरू केला होता. भाजपला उशिरा जाग आली व त्यांनी सदोष वीज मीटरविरोधात आंदोलन सुरू केले. तेव्हा ‘आतापर्यंत झोपला होतात का,’ असा प्रश्न नागरिक भाजपला विशेषत: विजय गोयल यांना विचारत होते. स्टिंग ऑपरेशन करून केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु त्याला थेट आव्हान देत टीम केजरीवाल यांनी सामान्यजनांची सहानुभूती मिळवली.
एकीकडे आरोपांना आव्हान देणारे केजरीवाल, तर दुसरीकडे पूर्ती उद्योगसमूहामुळे बदनाम झालेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, यात दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला साथ दिली.
काँग्रेसच्या या दारुण  पराभवाला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यापासून अनेक वरिष्ठ नेते कारणीभूत आहेत. जपानचे राजे दिल्लीत आल्याचे निमित्त पुढे करून पंतप्रधानांची एकमात्र सभा पंतप्रधान कार्यालयाने रद्द केली. निर्धारित वेळेपेक्षा दोन-तीन तास उशिरा पोहोचणारे राहुल गांधी यांचाही काँग्रेसच्या पराभवाला मोठा हातभार लागला आहे.
आचारसंहितेच्या काळात मेट्रो स्टेशन, झोपडपट्टीत आम आदमी पक्षाचे ‘सजग प्रहरी’ दिवसरात्र गस्त घालत होते. रोख पैशांचे वाटप, मेजवान्या, दारूचे वाटप आदी गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाची करडी नजर होतीच, पण आम आदमी पक्षाने त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी या हेल्पलाइनवर अशा एक हजार तक्रारी आल्या. निवडणुकीच्या काळात भाजपच्या २९ नेत्यांनी दिल्लीत २९३ सभा घेतल्या, ज्यात नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरींसारखे दिग्गज नेत्यांचा समावेश होता. त्या तुलनेत काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शीला दीक्षित यांनी केवळ बारा सभा घेतल्या. इकडे एकटय़ा अरविंद केजरीवाल यांनी १ नोव्हेंबर ते १ डिसेंबपर्यंत दिवसाला दोन अशा चौक सभा घेत दिल्लीचे सत्तर मतदारसंघ ढवळून काढले.
केजरीवाल यांनी जो या व्यवस्थेला पिचला आहे, महागाईने त्रस्त आहे, ज्याच्या रस्ता, पाणी, विजेसारख्या सामान्य गरजा पूर्ण होत नाही अशा ‘आम आदमी’ला साद घातली. फेसबुक, ट्विटरवरून आपला सात्त्विक संताप व्यक्त करणारी तरुणाईदेखील केजरीवाल यांच्यासोबत होती. व्यवस्थेच्या विरोधात राग असला तरी बंड करू न शकणारा एक मोठा वर्ग या देशात असून तोच आम आदमी पक्षाचा मतदार आहे. त्यामुळेच नऊ महिन्यांचे अपत्य असलेल्या आम आदमी पक्षाने दिल्लीत २७ जागा जिंकल्या आल्या आहेत.
करिश्मा कामाचा नाही!
राहुल गांधी व नरेंद्र मोदी यांच्या सभा झालेल्या डॉ. आंबेडकर नगर मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे राम किशन सिंघल निवडून आले. त्यामुळे राहुल गांधी व नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांचा करिश्मा केवळ माध्यमांपुरताच मर्यादित राहिला.
दिल्ली
*आम आदमी पक्षाच्या मनीष सिसोदिया यांनी पहारगंज मतदारसंघातून भाजपचे नकुल भारद्वाज यांच्यावर ११,४७६ मतांनी विजय मिळवला.
*काँग्रेस उमेदवार आणि शीला दीक्षित सरकारमधील शिक्षणमंत्री किरण वालिया यांचा ‘आप’च्या सोमनाथ भारती यांनी ११, ७४२ मतांनी पराभव केला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री राजकुमार चौहान यांना आम आदमी पक्षाच्या २६ वर्षीय राखी बिर्ला यांनी १०,५८५ मतांनी धूळ चारली.
एकूण जागा ७०
            २०१३    २००८    
भाजप     ३१     २३
काँग्रेस     ०८     ४३
आप         २८    ००
इतर        ०३     ०४
लढवय्या!
राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या अरविंद केजरीवाल यांनी ७५ वर्षीय शीला दीक्षितांना धूळ चारली आणि काँग्रेसलाही अस्मान दाखविले. प्राप्तीकर विभागात सहआयुक्त पदावर कार्यरत असलेल्या ४५ वर्षीय केजरीवाल यांनी समाजकारणासाठी सेवेचा राजीनामा दिला होता. त्यांना जेव्हा ‘राजकीय व्यवस्थेवर बाहेरून टीका करण्यापेक्षा राजकारणात प्रवेश करण्याचे’ आव्हान दिले गेले तेव्हा हे स्वीकारत केजरीवालांनी देशातील राजकारण अक्षरश: ढवळून काढले. महिलांची सुरक्षितता, वाढता भ्रष्टाचार, सत्तेची अवास्तव  धुंदी, पाण्याची वाढती बिले, भाज्यांच्या वाढत्या किमती अशा जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालत त्यांनी चुणूक दाखवली. अण्णा हजारे यांच्या देशव्यापी आंदोलनात केजरीवाल यांचे नेतृत्व प्रकाशझोतात आले. तत्पूर्वी देशात माहितीच्या अधिकाराचा कायदा यावा यासाठीही त्यांनी भरीव योगदान दिले होते. हजारे यांच्या चमूत पक्ष स्थापन करण्यावरून मतभेद झाले तेव्हा ‘संविधान निर्मिती’च्या दिनाचे औचित्य साधत २६ नोव्हेंबर रोजी केजरीवाल यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. पक्षाचे उद्दिष्ट नावातून प्रतिबिंबित व्हावे यासाठी पक्षाचे नाव ‘आम आदमी पक्ष’ असे ठेवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम्ही पराभव स्वीकारला आहे. आता पराभवाचे विश्लेषण करू आणि नेमके काय चुकले यावर चिंतन करू. दिल्लीच्या लोकांनी मला जी १५ वर्षे सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञ आहे.
शीला दीक्षित, मावळत्या मुख्यमंत्री, दिल्ली

आम आदमी पक्षाने पदार्पणातच जे यश मिळवले ते निश्चितच अभिनंदनीय आहे. अरविंद केजरीवाल यांचे हार्दिक अभिनंदन! तसेच गेली १५ वर्षे दिल्लीची सेवा करणाऱ्या शीला दीक्षित यांचेही मी आभार मानतो.
हर्ष वर्धन, भाजप दिल्ली मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

‘आप’ला मिळालेली मते म्हणजे ‘स्वच्छ आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या मागणीस लोकांनी दिलेला पाठिंबा आहे. आम्ही ‘अग्रसक्रिय विरोधक’ म्हणून भूमिका निभावू. हे यश खऱ्या अर्थाने दिल्लीच्या जनतेचे आहे.
अरविंद केजरीवाल, आम आदमी पक्षाचे प्रमुख

कारकीर्दच अडचणीत?
देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या महिला अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शीला दीक्षित यांचे विधानसभा निवडणुकीत अक्षरश: पानिपत झाले असून आम आदमी पक्षाच्या झाडूने त्यांच्या राजकीय कारकिर्दीसमोर नवे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा, ई-प्रशासन, सामाजिक सुरक्षा योजना दीक्षित यांना तारू शकल्या नाहीत. उलट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामधील भ्रष्टाचार, निवडणुकीच्या तोंडावर उसळलेली महागाई, आपल्याच पसंतीचे उमेदवार निवडण्याचा हेकटपणा, नेतृत्वाची दुसरी फळी उभी न करणे अशा बाबी अधिक प्रभावी ठरल्या. यामुळेच शीला दीक्षित यांचा पराभव झाला, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

माणसे जोडणारे ‘डॉक्टर साहेब’
निवडणूक तोंडावर आलेली असताना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून हर्ष वर्धन यांच्या गळ्यात माळ पडली. त्यावेळी भाजपमध्ये फाटाफूट होती. पण ‘कान-नाक-घसा तज्ज्ञ’ असलेल्य ‘डॉक्टर साहेबांनी’ भारतीय जनता पक्षातील सर्वाना एकत्र आणले. सदैव हसरा चेहेरा आणि मनमिळावू स्वभाव ही हर्ष वर्धन यांची वैशिष्टय़े. त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा या निवडणूकीत भाजपाला बराच फायदा झाला. दिल्लीमधून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यात हर्ष वर्धन यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निकटचे संबंध असून ‘अत्यंत स्वच्छ आमि लोकाभिमुख उमेदवार’ अशी त्यांची राजकारणातील प्रतिमा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi polls verdict aap shines body blow to cong bjp short of majority