दक्षिण दिल्लीतील विधानसभा मतदारसंघात पिण्याचे पाणी, बोकाळलेला भ्रष्टाचार, वाढती महागाई आणि शौचालये आदी मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार असून या मुद्दय़ांवरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
दक्षिण दिल्लीत उच्चभ्रू तसेच काही ग्रामीण भागही असून पिण्याचे पाणी, विजेचे दर हे प्रश्न मध्यमवर्गीयांसाठी जिव्हाळ्याचे आहेत. ग्रेटर कैलास, वसंत कुंज, हौस खास, सफदरजंग एन्क्लेव्ह, ग्रीन पार्क येथील नागरिकांच्या पार्किंग, पावसाळ्यात पाणी साचणे, शौचालये, स्वच्छता आणि निवासी भागांत वाढलेला व्यापार याबाबत वाढत्या तक्रारी आहेत.
लोकसंख्या वाढीच्या वेगामुळे सध्याच्या पायाभूत सुविधांवर ताण पडत असून तीच चिंतेची बाब आहे. त्यामुळेच पार्किंग, सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था, खराब रस्ते या समस्या मोठय़ा प्रमाणावर भेडसावत आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Story img Loader