नवी दिल्ली : दिल्ली आणि पंजाब काँग्रेसच्या नेत्यांनी वटहुकमाच्या मुद्दय़ावर आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्यास कडाडून विरोध केल्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची कोंडी झाली आहे. या दोन्ही राज्यांतील नेत्यांनी सोमवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांची पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली.
प्रशासकीय निर्णयाचे अधिकार नायब राज्यपालांकडे नव्हे तर, दिल्ली सरकारकडे असतील, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर केंद्र सरकारने त्याविरोधात वटहुकुम काढला व निकाल रद्द केला. जुलैत केंद्र सरकार यासंदर्भात संसदेमध्ये विधेयक मांडणार असून राज्यसभेत ते विरोधकांनी एकजुटीने हाणून पाडावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षांना केले आहे. जनता दलाचे (सं) प्रमुख नितीश कुमार यांच्या माध्यमातून केजरीवाल यांनी खरगे यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. केजरीवाल यांनी खरगे व राहुल गांधी यांच्याकडे भेटीसाठीही वेळ मागितली आहे.विरोध का?
दिल्लीमध्ये भाजपसह ‘आप’ही काँग्रेसचा विरोधक आहे. पंजाबमध्ये तर ‘आप’ हाच प्रमुख विरोधक आहे. शिवाय, गेल्या वर्षभरात केजरीवाल
यांनी सातत्याने काँग्रेसविरोधात भूमिका घेतली होती. भाजपविरोधात काँग्रेस नव्हे तर, ‘आप’ कडवी लढत देऊ शकते, असा प्रचार केजरीवाल यांनी गोवा, गुजरात आदी राज्यांमध्ये केला होता. अशावेळी ‘आप’ला पाठिंबा दिला तर काँग्रेसचे मोठे राजकीय नुकसान होईल, असे या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे स्पष्ट केले आहे.