Delhi Railway Station : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गेल्या काही दिवसांपासून महाकुंभमेळा सुरू आहे. या महाकुंभमेळ्यासाठी दिल्लीसह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक पवित्र स्नान करण्यासाठी जात आहेत. यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र, १५ फेब्रुवारी रोजी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रात्री ९:५५ वाजता घडली. कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
दिल्लीत चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर पुन्हा रेल्वेच्या काही प्लॅटफॉर्म गर्दी वाढत असल्याची परिस्थिती समोर येत आहे. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर पुन्हा लोकांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केल्याचं समोर आलं आहे. रेल्वेत चढण्यासाठी लोक गर्दी आणि धक्काबुक्की करत असल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिलं आहे. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतरही लोकांनी कोणताही धडा घेतला नसल्याचं दिसून येत आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि अधिकाऱ्यांनी दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आश्वासन दिलं असलं तरी वास्तविक परिस्थिती वेगळी असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. प्लॅटफॉर्म १६ वर बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेला काही तास होत नाही तोच पुन्हा प्लॅटफॉर्म नंबर १६ वर गर्दी होऊ लागली आहे. तसेच लोक रेल्वेत खिडक्यांमधून देखील चढत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर अजूनही गोंधळ सुरुच असल्याची परिस्थिती आहे. मात्र, प्रवाशी रेल्वेत चढताना कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये किंवा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना होत आहेत का? याबाबत अनेकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत रेल्वेकडून काय सांगितले गेलं?
चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत रेल्वेकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू उपाध्याय यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, शनिवारी रात्री कोणतीही रेल्वे रद्द झाली नव्हती. फलाट क्र. १४ वर प्रयागराज एक्सप्रेस येणार होती. प्रवाशी या रेल्वेची वाट पाहत होते. यातच फलाट क्र. १२ वर विशेष रेल्वेची घोषणा झाली. यामुळे १४ वरील प्रवाशी फलाट क्र. १२ कडे जाऊ लागले. यातून सदर चेंगराचेंगरीची घटना घडली.