दिल्लीत आज ( शुक्रवार २८ जून ) सकाळी मुसळधार पाऊस झाला असून या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी अजूनही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. दरम्यान, या पावसाचा फटका काँग्रेस नेते शशी थरूर यांनादेखील बसला आहे. या पावसामुळे आज सकाळी त्यांच्या दिल्लीतील घरातही पाणी साचलं.

शशी थरूर यांनी एक्स या सोशल मीडिया साईट व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. माझे ‘ल्युटन्स’ दिल्लीतील घर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. मी आज सकाळी झोपेतून उठलो तेव्हा संपूर्ण घरात पाणी शिरलं होतं. या पाण्यामुळे बेड आणि सोफ्यासह जमिनीवर असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं नुकसान झालं, असं शशी थरूर म्हणाले.

हेही वाचा – ‘नीट’चा मुद्दा उपस्थित करताच राहुल गांधींचा माईक केला बंद? काँग्रेसच्या दाव्यावर लोकसभा अध्यक्षांचंही उत्तर चर्चेत!

पुढे बोलताना, दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेजारच्या नाल्यांमध्ये पाणी तुंबलं असून हे पाणी वाहून जाण्यासाठी कुठेही जागा नाही, असंही त्यांनी सांगितले. तसेच लोकांना वीजेचा धक्का लागू नये, यासाठी सकाळी ६ वाजतापासून वीज बंद करण्यात आली होती, असेही ते म्हणाले. याशिवाय आज संसदेत पोहोचण्यासाठी मला थेट बोटीने प्रवास करावा लागला असता. मात्र, साचलेलं पाणी काढण्याचं काम युद्धपातळीवर झालं, त्यामुळे मी वेळेवर संसदेत पोहोचलो, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, आज झालेल्या पावसानंतर दिल्ली सरकारकडून आज दुपारी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. याशिवाय नायब उपराज्यपाल वी.के. सक्सेना यांनी पावसाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले.