संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर दयेचा अर्ज दाखल करणाऱ्या अफझल गुरूसंबंधी निर्णय घेण्याकामी दिल्लीत अलीकडेच झालेल्या बलात्कार प्रकरणाचा अटकाव निर्माण झाला आहे. दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच ही कबुली दिली आहे.
दिल्लीतील बलात्कार प्रकरण हाताळण्यात गृहमंत्रालय गुंतल्यामुळे अफझल गुरूच्या दया अर्जावर निर्णय घेण्यास आपल्याला अद्याप ‘वेळ’ मिळालेला नाही, असे शिंदे यांनी सांगितले. दिल्लीतील दुर्दैवी घटना गेल्याच महिन्यात घडली आहे, तर अफझल गुरूच्या दयेचा अर्ज गेली किमान पाच वर्षे प्रलंबित आहे, हे येथे उल्लेखनीय ठरावे.
अफझल गुरूच्या दया अर्जावर आपण काही निर्णय घेतला आहे काय, असा प्रश्न विचारला असता, त्याच्या अर्जाची फाइल आपल्याकडे आली असून त्यावर सरकारच्या शिफारशीसह ती फाइल लवकरात लवकर राष्ट्रपतींकडे पाठविण्याची आपली इच्छा आहे. मात्र, मध्येच हे बलात्काराचे प्रकरण निघाले आणि माझा बराच वेळ ते निपटण्यात खर्ची पडला. आता मी निर्णय घेईन, परंतु त्याच्या तपशिलात जायचे असल्याचे प्रतिपादन शिंदे यांनी केले.
राष्ट्रपती एखादी बाब आपल्याकडे दुसऱ्यांदा विचारार्थ पाठवितात, तेव्हा त्या मुद्दय़ाचा आपल्याला सखोल अभ्यास करावा लागतो, हे सांगण्यास शिंदे विसरले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा