नवी दिल्ली : दिल्लीच्या हवेचा दर्जा बुधवारी, सलग तिसऱ्या दिवशी, वाईट नोंदवला गेला. येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीच्या हवेत सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याचे हवेच्या गुणवत्तेवर देखरेख करणाऱ्या संस्थेने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी सकाळी १० वाजता दिल्ली शहराच्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २३८ इतका होता, मंगळवारी दुपारी ४ वाजता हा निर्देशांक २२० इतका नोंदवला गेला. दिल्लीत मंगळवारी विजयादशमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यामुळे प्रदूषणात भर पडली. दिल्लीच्या आजूबाजूच्या शहरांमध्येही हवेची परिस्थिती चांगली नाही. गाझियाबादमध्ये १९६, फरिदाबादमध्ये २५८, गुरुग्राममध्ये १७६, नोएडामध्ये २०० आणि ग्रेटर नोएडामध्ये २४८ इतका एक्यूआय नोंदवण्यात आला.

हेही वाचा >>> ‘एक देश, एक निवडणूक’वर विस्तृत चर्चा; माजी राष्ट्रपती कोविंद यांच्यासमोर विधि आयोगाचे सादरीकरण

प्रदूषणमंत्र्यांचा डीपीसीसीवर आरोप

दिल्लीमध्ये प्रदूषणाचे स्रोत निश्चित करण्यासाठी प्रथमच हाती घेण्यात आलेला राज्य सरकारचा अभ्यास दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष अश्विनी कुमार यांच्या एकतर्फी निर्णयामुळे थांबला असल्याचा आरोप प्रदूषणमंत्री गोपाल राय यांनी केला. अभ्यासासाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित होता.

सुरक्षित हवा कोणती?

शून्य ते ५० एक्यूआय असलेली हवा चांगली, ५१ ते १०० एक्यूआयची हवा समाधानकारक, १०० ते २०० दरम्यान मध्यम, २०१ ते ३०० वाईट, ३०१ ते ४०० अतिशय वाईट आणि ४०१ ते ५०० एक्यूआय असलेल्या हवेची गुणवत्ता गंभीर मानली जाते. ‘एक्यूईडब्लूएस’ ही प्रणाली भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) विकसित केली आहे.

प्रदूषणवाढीचे कारण काय?

फटाक्यांसह पंजाबसह आजूबाजूच्या राज्यांमध्ये धान कापल्यानंतर उरलेली ताटे जाळणे, प्रदूषणांचे स्थानिक स्रोत यामुळे दरवर्षी दिवाळीच्या सुमाराला दिल्लीत प्रदूषण वाढते.

दिल्लीला प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी तातडीने वैज्ञानिक आकडेवारीची गरज असताना असा निर्णय घेण्यात आला हे अत्यंत दुर्दैवी आहे. – गोपाल राय, प्रदूषणमंत्री, दिल्ली

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi records air quality severe for third day in row zws