Atul Subhash Suicide: बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या अतुल सुभाष यांनी काही दिवसांपूर्वी पत्नी आणि सासरच्या त्रासामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर हे प्रकरण देशभर चर्चेत आले. सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. विवाहित पुरूषांसाठी कायदे नसल्यामुळे त्यांचा छळ होत असल्याचा मुद्दा अनेक लोक मांडत आहेत. अतुल सुभाष यांच्या बाजूने बोलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच त्यांना ज्या परिस्थितीत आत्महत्या करावी लागली, त्याचीही चर्चा होत आहे. अशातच आता दक्षिण दिल्लीमधील एक रेस्टॉरंटने अतुल सुभाष यांना अनोखी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. ज्यामुळे इंटरनेटवर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या रेस्टॉरंटने ग्राहकांना दिलेल्या बिलावर अतुल सुभाष यांच्यासाठी संदेश लिहिला आहे.

बिलावर काय संदेश लिहिण्यात आला?

दक्षिण दिल्लीतील हाऊज खास व्हिलेज या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती जेवणासाठी गेला होता. जेवण झाल्यानंतर त्या व्यक्तीने बिल बघितल्यानंतर त्याला धक्काच बसला. कारण बिलाच्या खाली अतुल सुभाष यांच्यासाठी भावनिक संदेश लिहिलेला दिसला.एका रेडीट युजरने सदर बिल सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

हे वाचा >> Atul Subhash Case: अतुल सुभाष यांच्या पत्नीने फेटाळले छळवणुकीचे आरोप; म्हणे, “जर मी त्याला छळलं असेल तर…”

या संदेशात लिहिले, “अतुल सुभाष यांच्या आत्महत्येबद्दल आम्हाला अतीव दुःख वाटते. इतर लोकांसारखेच त्यांचे जीवनही महत्त्वाचे होते. भावा श्रद्धांजली व्यक्त करतो. अखेर तुला तुझ्या जगात शांती मिळेल, अशी आशा बाळगतो.”

रेडिट युजरने या घटनेबद्दल माहिती दिली आहे. माझ्या मित्राने सदर हॉटेलला भेट दिली होती आणि बिलावरील या अनपेक्षित संदेशामुळे तो भारावून गेला. या अनोख्या बिलाबद्दल बोलताना हॉटेल मालकाने सांगितले की, प्रत्येक गोष्ट व्यवसाय म्हणून पाहता येत नाही. आयुष्यही महत्त्वाचे आहे. आपण त्याला परत आणू शकत नाही. पण आपण त्याचे नाव घेऊन त्याला आठवणीत तरी ठेवू शकतो.

रेडिटवरील या पोस्टला चांगली पसंती मिळत असून रेडिटवरील हजारोंनी पोस्टला लाईक मिळाले आहेत. अनेकांनी रेस्टॉरंटच्या मालकाच्या कल्पकशक्तीला सलाम केला आहे. तर काही लोकांना ही गोष्ट दुःखद वाटली.

नेमकं प्रकरण काय?

अतुल सुभाष यांचा मृतदेह बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांच्या मृतदेहासोबत २४ पानांची सुसाईड नोट सापडली. त्याचबरोबर अतुल सुभाष यांनी जवळपास ९० मिनिटांचा एक व्हिडीओही रेकॉर्ड केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी पत्नी निकितावर मानसिक छळ केल्याचे आरोप केले होते. यानंतर घरगुती हिंसाचारासंदर्भातले कायदे, महिलांच्या बाजूने केला जाणारा विचार आणि पुरुषांवरील मानसिक ताण याबाबत मोठी चर्चा सुरू झाली.

Story img Loader