मालमत्तांच्या वादामध्ये कुणाचा कुणाच्या मालमत्तेवर कसा आणि किती अधिकार आहे, यावरून अनेकदा न्यायालयापर्यंत वाज जातात. यासंदर्भात न्यायालयांकडून वेळोवेळी आधारभूत ठरतील असे निकाल देण्यात आले आहेत. असाच एक निकाल दिल्ली सत्र न्यायालयाने दिला असून मुलीच्या निधनानंतर देखील तिचा पती आणि तिच्या मुलांचा वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार आहे, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने यासंदर्भात स्पष्ट टिप्पणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साकेत कोर्टाचे न्यायमूर्ती नरेश कुमार लाका यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातल्या एका प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेनुसार त्यांच्या दिवंगत आईच्या भावाने वडिलांच्या मालमत्तेमधील त्यांचा अधिकार नाकारला आहे. आईचं निधन झाल्यामुळे तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर पतीचा आणि मुलांचा अधिकार नसल्याचं सांगत भावाने याचिकाकर्त्यांना मालमत्ता हक्क नाकारला आहे. यासंदर्भात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

“जरी मुलीचा मृत्यू झाला असेल तरी तिचे पती आणि तिच्या मुलांचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये अधिकार आहे. त्यामुळे मुलीच्या हिश्याविषयी योग्य तो निर्णय झाल्याशिवाय मालमत्तेतील इतर भागीदार मालमत्ता विक्री करू शकत नाहीत”, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.

“याचिकाकर्त्याच्या आईचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार असून या मालमत्तेतील एक तृतियांश हिश्श्यावर मुलीचा अधिकार आहे”, असं म्हणत न्यायालयाने संबंधित प्रशासनाला मालमत्तेचं बाजारमूल्य काढण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत सदर मालमत्तेची विक्री करता येणार नाही, असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi saket court says even id daughter dies husband children right in fathers property pmw