Air India flight lands Russia : दिल्लीहून अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोला चाललेल्या एअर इंडियाच्या विमानाला गुरूवारी तांत्रिक बिघाडामुळे रशियाच्या क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. एअर इंडियाने एक्स या सोशल मीडिया साईटवर सविस्तर पोस्ट टाकून या घटनेचे कारण सांगितले.
एअर इंडियाने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, दिल्लीहून सॅन फ्रॅन्सिस्कोला निघालेल्या एअर इंडियाच्या एआय-१८३ या विमानात तांत्रिक बिघाड जाणवल्यामुळे रशियाच्या क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरविण्यात आले आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून एकत्र काम करत आहोत. जेणेकरून विमान पुन्हा एकदा आपल्या निश्चित स्थळी मार्गस्थ होईल. प्रवासी आणि क्रू सदस्यांची सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
दुसऱ्या विमानाचा बंदोबस्त सुरू
एअर इंडियाच्या एआय-१८३ विमानात २२५ प्रवाशी आणि १६ क्रू सदस्य आहेत. सर्व लोक सुरक्षित असल्याचे एअर इंडियाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सरकारी यंत्रणा आणि विमानतळ नियामक प्राधिकरण यांच्याशी आमचा संपर्क असल्याचेही त्यांनी सांगितले. “प्रवाशी आणि क्रू सदस्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही चिंतित आहोत. लवकरच आम्ही दुसऱ्या विमानाचा बंदोबस्त करत असून नवीन विमान पाठविण्याचा आमचा प्रयत्न आहे. बोइंग ७७७ विमानाला रशियाच्या विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवले गेले असून कुणीही जखमी नसल्याची माहिती मिळत आहे”, असेही एअर इंडियाच्या वतीने सांगितले गेले.
ताजी अपडेट
मुंबईहून जेवण आणि इतर अत्यावश्यक वस्तू घेऊन नवे विमान रशियाच्या दीशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. हे विमान आता प्रवाशांना अमेरिकेत घेऊन जाईल.