दिल्लीतील भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी यांच्या रोड शोमध्ये सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी सहभागी झाली. सपना चौधरीला बघण्यासाठी रोड शोत गर्दी वाढली आणि अखेर पोलिसांना लाठीमार करत गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले.
लोकसभा निवडणुकीतीलील उर्वरित तीन टप्प्यांसाठी प्रचार शिगेला पोहोचला असून दिल्लीतील राजकीय वातावरणही तापले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेलिब्रिटींनाही प्रचारात उतरवले जात आहे. उत्तर पूर्व दिल्लीतील भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी यांनी देखील आपल्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. मलकागंज भागात शुक्रवारी मनोज तिवारी यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोमध्ये हरयाणातील प्रसिद्ध नृत्यांगना आणि गायिका सपना चैाधरी देखील उपस्थित होती. खुल्या जीपमधून मनोज तिवारी, सपना तिवारी आणि भाजपाचे अन्य वरिष्ठ नेते प्रचार करत होते. मात्र, सपना चौधरीमुळे रोड शोमधील गर्दी वाढली. सपनाची एक झलक पहायला मिळावी म्हणून चाहत्यांची धावपळ सुरु होती. हळूहळू ही गर्दी अनियंत्रित होऊ लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी किरकोळ लाठीमार करत गर्दीवर नियंत्रण मिळवले आणि सपना चौधरीला पोलीस संरक्षणात तिथून बाहेर काढण्यात आले.
सपना चौधरीच्या कार्यक्रमात गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कानपूरमध्येही स्टेज शो दरम्यान प्रेक्षक अनियंत्रित झाले होते. ज्यामुळे सपनाला कार्यक्रम अर्ध्यातच थांबवावा लागला होता.
दरम्यान, मनोज तिवारी हे २०१४ मध्ये उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. यंदा भाजपाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. मनोज तिवारींसमोर काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित व आम आदमी पार्टीचे उमेदवार दिलीप पांडे यांचे आव्हान आहे. दिल्लीतील सातही लोकसभेच्या जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांअगोदर सपनाच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र नंतर तिने मनोज तिवारी यांना समर्थन देत असल्याचे जाहीर केले.