दिल्लीतल्या सराय काले खान परिसरात मानवी शरिराचे तुकडे सापडले आहेत. ही घटना श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाची आठवण करून देत आहे. पोलिसांनी येथे सापडलेले मानवी शरिराचे तुकडे परीक्षणासाठी पाठवले आहेत. जेणेकरून हा मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा हे कळू शकेल. तसेच मृतदेहाबद्दची माहिती मिळू शकेल. पोलिसांनी सांगितलं की, “प्रथमदर्शनी हे हत्येचं प्रकरण दिसतंय. यामुळे भारतीय दंडविधानाच्या कलम ३०२ अंतर्गत प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.”
पोलिसांनी सांगितले की, “त्यांना माहिती मिळाली होती की सनलाईट कॉलनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सराय काले खान परिसरात मानवी शरिराचे तुकडे सापडले आहेत. मानवी अवयवांचे हे तुकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.”
दरम्यान, मृतदेहाच्या तुकड्यांजवळ केसांचा पुंजका पोलिसांना सापडला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची तपासणी केली आणि तिथे सापडलेले अवशेष पुढील प्रक्रियेसाठी एम्स रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहेत. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही, ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हा महिलेचा मृतदेह असल्याचा दावा
मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतदेहाचे तुकडे पॉलिथीन बॅगमध्ये सापडले आहेत. हे दृष्य पाहणाऱ्या लोकांना मोठा धक्का बसला. असं म्हटलं जात आहे की, हत्या करून मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. त्यानंतर ते तुकडे पॉलिथीन बॅगेत भरून फेकून देण्यात आले. पॉलिथीन बॅग ज्या ठिकाणी होती त्या परिसरात दुर्गंधी पसरू लागली. त्यानंतर स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
हे ही वाचा >> दिल्लीतलं वातावरण तापलं, पोलीस राहुल गांधींच्या घरी दाखल; चौकशीबाबत विचारताच म्हणाले, “थोडा वेळ…”
दरम्यान, आज तक या वृत्तवाहिनीने दावा केला आहे की, हा एका महिलेचा मृतदेह आहे. पॉलिथीनमध्ये महिलेची कवटी, कंबरेखालचा भाग, हाताचे तुकडे आणि पंजा सापडला आहे.