Seelampur Kunal Murder News: दिल्लीच्या सीलमपूर येथे गुरुवारी रात्री कुणाल नामक १७ वर्षीय मुलाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी दुसऱ्या धर्माचा असल्याचा आरोप केला जात असून चार ते पाच जणांच्या टोळक्याने हत्या केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरातील काही घरांवर ‘हिंदूंचे पलायन होत आहे’, ‘हे घर विकायचे आहे’, अशा आशयाचे पत्रक लावले जात असून स्थानिकांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची याचना केली आहे.
कुणालच्या हत्येनंतर स्थानिक नागरिक रोष व्यक्त करत असून रस्त्यावर उतरून निदर्शन करत आहेत. यावेळी काही आंदोलकांनी हेच पोस्टर हातात घेतल्याचेही दिसले. ‘हिंदू लोक येथून पलायन करत आहेत’, असा संदेश या पत्रकांवर लिहिला आहे.
हत्याकांड कसे झाले?
उत्तर पूर्व दिल्लीतील सीलमपूर येथील जी-ब्लॉक परिसरात कुणालची गुरूवारी रात्री हत्या करण्यात आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमी कुणाला जेपीसी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हत्याकांडानंतर दिल्ली पोलिसांच्या वतीने सीलमपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींना पकडण्यासाठी पथके तैनात केली आहेत. आरोपींची ओळख पटविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. या हत्येमागचा हेतू अद्याप स्पष्ट झाला नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
योगी आदित्यनाथांकडून मागितली मदत
या हत्येनंतर सीलमपूर परिसरातील लोक दहशतीखाली आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांनी ज्याप्रकारे कारवाई केली, त्याप्रमाणे कारवाई व्हावी, अशी मागणी केली. सीलमपूरमध्येही बुलडोझर कारवाई व्हावी, असे लोक सांगत आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिली आहे.
हत्येच्या मागे लेडी डॉनचा हात?
कुणालच्या हत्येमागे परिसरातील एका लेडी डॉनचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कुणालचे वडील राजबीर सिंह यांच्या डोळ्यात देखत हत्या झाली, असे सांगितले जात आहे. माध्यमांशी बोलताना राजबीर सिंह म्हणाले की, चार ते पाच जणांनी मिळून माझ्या मुलाची हत्या केली. त्यामध्ये साहिल नावाचा मुलगा होता. तर झिकरा नावाची मुलगी लांबून हे पाहत होती.
दरम्यान झिकराचा हत्येतला सहभाग अद्याप स्पष्ट झालेला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गुरूवारी रात्री तिची प्राथमिक चौकशी केल्यानंतर तिला सोडून देण्यात आले. जिकरा सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ अपलोड करत असून ती स्वतःला लेडी डॉन असल्याचे सांगते.