आसाराम बापू, गुरमित राम रहीम यांच्यानंतर आता आणखी एका स्वयंघोषित अध्यात्मिक गुरुवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वयंघोषित संत दाती महाराजवर त्यांच्या एका शिष्येने बलात्काराचा आरोप केला असून या प्रकरणी पोलिसांनी दाती महाराजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे गुन्हा दाखल होताच ‘फरार’ झालेल्या दाती महाराजांनी माध्यमांना एक व्हिडिओ पाठवून त्यांची बाजू मांडली.  मी त्या मुलीवर कोणताही आरोप करणार नाही. मी तपासात सहकार्य करण्यास तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरीमधील शनिधाम मंदिरालगत दाती महाराजांचे आश्रम आहे. पीडित तरुणी २५ वर्षांची असून ती गेल्या १० वर्षांपासूव दाती महाराज यांची अनुयायी होती. ‘दाती महाराजने माझ्यावर आश्रमात बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी मला देण्यात आली. हे अत्याचार असह्य झाल्याने मी शेवटी पोलिसांकडे गेले’, असे पीडित तरुणीने म्हटले आहे.

‘दोन वर्षांपूर्वी माझ्यावर बलात्कार करण्यात आला होता. आश्रमातील महिला अनुयायी मला बळजबरीने दाती महाराजच्या खोलीत न्यायच्या. अत्याचाराला कंटाळून मी त्यावेळीच आश्रमातून पळ काढला. घरी जाऊन आई- वडिलांना हा प्रकार सांगितला. पण दाती महाराज यांचे बड्या नेत्यांशी संबंध असल्याने मी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास घाबरत होते. शेवटी मी धाडस दाखवले आणि तक्रार दाखल केली, असे तिने स्पष्ट केले.

जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दाती महाराज पसार झाले असले तरी गुरुवारी त्यांनी माध्यमांना एक व्हिडिओ पाठवून प्रतिक्रिया दिली. मी त्या मुलीवर कोणताही आरोप करणार नाही. मी तपासात सहकार्य करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे न्यायालयाने दाती महाराजविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे.