सुंदर मुलींचे फेक फेसबुक प्रोफाईल बनवून SexTortion वसूल करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी पकडलं आहे. या टोळीचा म्होरक्यासुद्धा पोलिसांच्या हाती लागला आहे. आत्तापर्यंत या टोळीने २०० जणांना फसवलं असल्याचं तपासात समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेवात भागातल्या SexTortion गँगची सोशल मीडियावर दहशत होती. अनेक जण या गँगच्या जाळ्यात अडकले होते. या गँगचे सदस्य फेसबुकवर सुंदर मुलींच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करायचे आणि लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचे. त्यानंतर त्या लोकांशी मैत्री करायचे आणि त्यांना गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवायचे. त्यानंतर त्यांचा नंबर घेऊन व्हॉटसपवरही गप्पा सुरु व्हायच्या.
काही काळानंतर व्हिडिओ कॉलही सुरु व्हायचे. या गँगचे सदस्य मुलींचे अश्लिल व्हिडिओ लोकांना दाखवायचे आणि समोरच्या व्यक्तीचा अश्लिल व्हिडिओ बनवायचे. आणि त्यानंतर या लोकांना ब्लॅकमेल केलं जायचं. ही गँग व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायची आणि त्याच्या बदल्यात १५ ते २० हजार रुपयांची मागणी करायचे.
दिल्ली पोलिसांकडे या गँगच्या तावडीत सापडलेल्या एका तरुणाने तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करत असताना पोलीस हरयाणाच्या मेवात भागापर्यंत पोहोचले आणि आरोपींना ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की आरोपीने आत्तापर्यंत २०० लोकांना ब्लॅकमेल केल्याचं कबूल केलं आहे.
आरोपीने सांगितलं की त्यांनी फेसबुक, व्हॉटसप, टेलिग्राम आणि टिंडरवरुन अनेक लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. दिल्लीबरोबरच देशातल्या अनेक राज्यातले लोक या गँगच्या तावडीत सापडले असून या गँगने लाखो रुपये लंपास केले आहेत.