आपल्या लिव्ह-इन-पार्टनरचा खून करुन प्रियकराने मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची विचित्र घटना दिल्लीमध्ये समोर आली आहे. वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीचा खून करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाला कठोर शिक्षा करावी अशी मागणी सध्या होताना दिसत आहे. समोर येत असणारी माहिती आणि ज्या निघृणपणे श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले त्याबद्दल वाचून अंगावर काटा येतो असा हा घटनाक्रम आहे. मात्र असं असतानाच आफताबने जिच्यावर प्रेम केलं तिलाच एवढ्या क्रूरपणे कसं संपवलं असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. मात्र यासंदर्भात बोलताना मानसोपचारतज्ज्ञांनी अशाप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये संवादाचा आभाव आणि फार संताप या दोन गोष्टी कारणीभूत असतात असं म्हटलं आहे. तसेच टीव्ही मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमधील कंटेंटमधून हिंसा ही सामान्य गोष्ट असल्याचं लोकांच्या मनावर बिंबवलं जात असल्याचंही मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”
फॉरेन्सिक मानरोपचारतज्ज्ञ दीप्ति पुराणिक यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रद्धा खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर असे विचित्र गुन्हे घडण्यामागील कारणांची मिमंसा केली आहे. “अशा घटनांसाठी विशेष एखाद्या गोष्टीला कारणीभूत ठरवता येणार नाही. अमुक एका गोष्टीमुळे त्याने अशी वर्तवणूक केली असं म्हणता येणार नाही,” असं पुराणिक यांनी सांगितलं. रागाच्याभरात आपल्या जोडीदाराचा खून करण्यात आलेल्या या प्रकरणाकडे पाहताना लोकांमधील असहिष्णुता वाढत असल्याचं जाणवतं असंही मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. “सध्या आपण पाहतो की लोक फार लवकर एखाद्या गोष्टीचं किंवा घटनेचं टेन्शन घेतात आणि मानसिक ताणावामध्ये जातात. त्यांना ही निराशा अनेकदा सहन होत नाही. अशा प्रकरणांमध्ये अनेकदा खुंटलेला संवाद हेच महत्त्वाचं कारण असतं. त्यामुळेच एकमेकांशी चर्चा करण्याऐवजी आणि वादाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याऐवजी दोघेही एकमेकांशी वाद घालतात. सामान्यपणे लोक संवाद साधणं टाळतात. अनेकदा अशा परिस्थितीमध्ये जोडीदार एकमेकांचं ऐकून घेत नाही,” असं पुराणिक यांनी सांगितलं.
नक्की पाहा >> Shraddha Murder Case Photos: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, कबुली जबाब अन् थेट ‘त्या’ जंगलात आफताबबरोबर पोहोचले पोलीस
राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राचार्या असलेल्या स्मिता पांडे यांनी आफताब प्रकरणासंदर्भात भाष्य केलं आहे. अनेक जुने मुद्दे, जुन्या कटू आठवणी आणि समाजाला मान्य न होणाऱ्या जीवशैलीमुळे काही लोक अचानक संतापतात आणि त्यामधून असे गुन्हे घडतात. “सध्याच्या परिस्थितीमध्ये लोक दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टीही माफ करत नाही. असा सर्व संताप, घटना मनात साचून राहतात आणि नंतर त्याचा विस्फोट होतो. अशावेळी लोकांना स्वत:च्या रागावर नियंत्रण मिळवता येत नाही,” असं पांडे यांनी सांगितलं.
नक्की वाचा >> “मी आजची रात्र याच्याबरोबर राहिले तर…”; प्रियकर आफताबने हत्या करण्यापूर्वी श्रद्धाने मित्राला केला होता Whatsapp मेसेज
अशाप्रकारचा राग थोपवून धरण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग उपलब्ध नसल्याचं पांडे यांनी सांगितलं. अशा गुन्ह्यांमध्ये अनेकदा खुंटलेला संवाद हेच मूळ कारण असतं असंही पांडे यांनी अधोरेखित केलं. आफताबने दिलेल्या माहितीनुसार १८ मे रोजी लग्नाच्या मुद्द्यावरुन श्रद्धाबरोबर वाद झाल्याने त्याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने पुढील तीन आठवड्यांमध्ये घरीच श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन आधी फ्रिजमध्ये साठवले आणि नंतर जंगलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे तुकडे फेकून देत त्यांची विल्हेवाट लावली.