Prayagraj Express Rush: प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी होऊन त्यात ३० भाविकांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महाकुंभमेळ्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातला. याहीवेळी चेंगराचेंगरीचंच निमित्त ठरलं. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या १४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर झालेल्या या चेंगराचेंगरीत १८ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. प्रयागराजच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वेत बसण्यासाठी प्लॅटफॉर्मवरच्या जिन्यावरून शेकडो लोक एकाच वेळी खाली उतरले आणि ही दुर्घटना घडली. आता या दुर्घटनेनंतर तिथे आप्तस्वकीयांना गमावलेल्यांचे काळीज पिळवटून टाकणारे अनुभव समोर येऊ लागले आहेत.
शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ही घटना घडली. प्रयागराजच्या दिशेनं जाणाऱ्या शिवगंगा एक्स्प्रेस आणि मगध एक्स्प्रेस या दोन रेल्वे त्यावेळी स्थानकात उभ्या होत्या. १४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर मगध एक्स्प्रेस उभी होती. प्रयागराजसाठी विशेष रेल्वेचीही घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ झाला. त्यात झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर रेल्वे प्रशासनानं चौकशीचे आदेश दिले आहेत.
गर्दी पाहून परत निघाले होते, पण…
दिल्लीचे रहिवासी असलेले ओपल सिंह हे पत्नी, दोन मुली व दोन भाऊ यांच्यासमवेत कुंभमेळ्यासाठी निघाले होते. पण रेल्वेस्थानकावरची तुफान गर्दी पाहून त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. ते निघालेही, पण तेवढ्यात चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. यात त्यांच्या ७ वर्षांच्या धाकट्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
“तिच्या डोक्यात खिळा घुसला आणि…”
चेंगराचेंगरीचा प्रसंग सांगताना ओपल सिंह यांना अश्रू अनावर झाले. “आम्ही आधी स्टेशनवर गेलो होतो. पण गर्दी पाहून आम्ही म्हटलं परत घरी जाऊ. पायऱ्यांवरून आम्ही चढायला सुरुवात केली, पण तेवढ्यात पायऱ्यांवरून अचानक ५-६ हजार लोक खाली यायला लागले. तिथे लोक एकावर एक पडू लागले. त्यांचं सामान त्यांच्या अंगावर पडलं. लोकांना सावरायला वेळच मिळाला नाही. माझी मुलगी बाजूच्या लोखंडी रेलिंगमध्ये अडकली. तिच्या डोक्यात खिळा घुसला”, असं ओपल सिंह सांगतात.
“आम्ही आधी शिवगंगा एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी गेलो होतो. तिथे खूप गर्दी होती, मग आम्ही मगध एक्स्प्रेसमध्ये जाऊ असं आम्ही म्हटलं. आम्ही तिथून १४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर आलो. पण तिथेही खूप गर्दी होती. मग आम्ही ठरवलं की परत घरी जाऊ. मी, माझी पत्नी, माझ्या दोन मुली आणि दोन भाऊ असे आम्ही तिथे गेलो होतो. माझी पत्नी आणि मोठी मुलगी जिन्यावरून वर पोहोचले होते. पण माझी छोटी मुलगी, दोन भाऊ आणि मी खाली राहिलो. लोकांचा लोंढा खाली आला. रेलिंग पकडत पकडत आम्ही परत खाली आलो. पण माझी धाकटी मुलगी रेलिंगमध्ये अडकली. खाली पडलेल्या दोन लहान मुलांना उचलून मी त्यांच्या पालकांकडे सोपवलं. पण मी माझ्या मुलीला वाचवू शकलो नाही”, अशी खंत ओपल सिंह बोलून दाखवत असताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
“माझ्यासोबत लहान मुली होत्या. मला कोणती रिस्क घ्यायची नव्हती. म्हणून आम्ही तिथून निघालो होतो, पण १४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरच्या पायऱ्यांवर मोठी गर्दी झाली होती. तिथेच चेंगराचेंगरी झाली. लोक वरून खाली उतरत होते. माझ्या मुलीला रुग्णालयात नेण्यासाठी कोणतीही मदत मिळाली नाही. आम्ही जेव्हा रुग्णालयात नेलं, तेव्हा डॉक्टर म्हणाले की थोडा वेळ आधी आला असतात तर कदाचित तुमची मुलगी वाचू शकली असती”, असं ओपल सिंह यांनी सांगितलं.
उद्घोषणांमुळे गोंधळ?
दरम्यान, एकाचवेळी दोन ट्रेनच्या झालेल्या उद्घोषणांमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे प्रयागराज एक्स्प्रेस असताना दुसरीकडे मगध एक्स्प्रेस विशेष रेल्वेचीही घोषणा झाल्यामुळे प्रवाशांची धावपळ झाली, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.