Prayagraj Express Rush : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा १८ झाला असून त्यात ११ महिला व पाच मुलांचा समावेश आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली, याची चौकशी दिल्ली पोलीस आणि रेल्वेने सुरू केली आहे. दरम्यान, या दिवशी ६ ते ८ वाजेपर्यंत २ हजार ६०० अतिरिक्त तिकिटे बुक करण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दररोज सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत सरासरी ७ हजार तिकिटे बुक केली जातात. मात्र, घटनेच्या दिवशी त्याच कालावधीत ९ हजार ६०० हून अधिक सामान्य श्रेणीची तिकिटे बुक करण्यात आली होती. अनारक्षित तिकिटिंग सिस्टम (UTS) वर बुक झालेल्या तिकिटांचा हा आकडा आहे.

युटीएसद्वारे किती तिकिटे बुक झाली होती?

शनिवारी यूटीएसद्वारे एकूण ५४,००० हून अधिक सामान्य श्रेणीची तिकिटे बुक करण्यात आली. “१५ फेब्रुवारी रोजी प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने लोक होते यात शंका नाही. तरीही ८ फेब्रुवारी आणि २९ जानेवारी रोजी बुक केलेल्या एकूण यूटीएस तिकिटांपेक्षा ती संख्या कमीच आहे. या दोन्ही दिवशी अनुक्रमे ५४,६६० आणि ५८,००० सामान्य श्रेणीची तिकिटे बुक करण्यात आली होती. गर्दीचे व्यवस्थापन करता आले असते”, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाकुंभला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या एकूण बुक झालेल्या तिकिटावरून काढता येत नाहीय. कारण, महाकुंभामुळे, सध्या भारतीय रेल्वे अनेक प्रमुख मार्गांवर तिकिटांची तपासणी करत नाही. आधीच मोठी गर्दी आहे; लोक ट्रेनमध्ये उभे राहण्यासाठीही संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत, सामान्य वर्गातील लोकांनी तिकीट बुक केले आहे की नाही हे तपासणे अशक्य आहे. यूटीएस तिकिटाचा हा आकडा प्रातिनिधिक आहे.परंतु प्रत्यक्ष गर्दी कितीतरी जास्त असू शकते”, असे दुसऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

या दोन महत्त्वाच्या तासांदरम्यान यूटीएसद्वारे बुक होणाऱ्या अधिक तिकिटांचा अंदाज घेऊन रेल्वे प्रशासनाने नियोजन आखले असते तर ही घटना टाळता आली असती, असे अधिकाऱ्याने सांगितले.

चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली?

रात्री नवी दिल्लीहून प्रयागराजला चार रेल्वेगाड्या जाणार होत्या. त्यापैकी तीन गाड्या विलंबान धावत होत्या. त्यामुळे स्थानकात गर्दी होती. फलाट क्रमांक १४वर प्रयागराज एक्स्प्रेस उभी असताना फलाट क्रमांक १६वर प्रयागराज विशेष या गाडीची उद्घोषणा झाली. त्यामुळे नेमकी आपली गाडी कोणती, यावरून प्रवाशांचा गोंधळ उडाला. त्यातच फलाट क्रमांक १४ आणि १५ला जोडणारा जिना अरुंद होता. एकाच वेळी हजारो प्रवाशांनी जिन्याकडे धाव घेतल्यामुळे चेंगराचेंगरी झाली
असावी, असा अंदाज आहे.

“नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आरपीएफ आणि जीआरपी दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे. प्रयागराजच्या दिशेने जाणाऱ्या सर्व विशेष गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रयागराजला जाऊ इच्छिणाऱ्या सर्व प्रवाशांनी स्टेशनच्या अजमेरी गेट बाजूने ये-जा करावी” असे रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

Story img Loader