Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर १५ फेब्रुवारी रोजी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या चेंगराचेंगरीच्या घटनेत तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला झाला होता, तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. ही घटना रेल्वे प्लॅटफॉर्मवर अचानक मोठ्या प्रमाणात जमलेल्या गर्दीमुळे झाल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच चेंगराचेंगरीची घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी देखील करण्यात येत होती. मात्र, आता या घटनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील चेंगराचेंगरीची घटना घडली तेव्हा एकाचवेळी जास्तीत जास्त किती हजार तिकीटे विकले गेले होते? याची आकडेवारी केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या दिवशी प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यामध्ये चढण्याचा प्रयत्न करताना १८ जणांचा मृत्यू झाला होता, त्या दिवशी विकले गेलेले एकूण तिकिटे गेल्या सहा महिन्यांत विकल्या गेलेल्या दैनिक सरासरी तिकिटांपेक्षा १३००० पेक्षा जास्त होती, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले?
“चेंगराचेंगरीच्या दिवशी सुमारे ४९,००० जनरल तिकिटे विकली गेली होती. तसेच गेल्या सहा महिन्यांत सरासरी ३६,००० तिकिटे विक्री झाली होती. खासदार माला रॉय यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, “१५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून अंदाजे ४९,००० जनरल तिकिटे विकली गेली होती. जी मागील सहा महिन्यांत विकल्या जाणाऱ्या दैनिक सरासरी तिकिटांपेक्षा १३००० पेक्षा जास्त होती”, अशी माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितली.
महाकुंभमेळ्यासाठी तेव्हा अतिरिक्त प्रवासाची पूर्तता करण्यासाठी पाच विशेष गाड्या चालवण्या जात होत्या. एका विशेष ट्रेनमध्ये अंदाजे ३००० प्रवासी प्रवास करतात. १५००० अतिरिक्त प्रवाशांसाठी पाच गाड्या पुरेशा होत्या, असंही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सभागृहात म्हटलं आहे. दरम्यान, चेंगराचेंगरीला कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांसह तिकिटांच्या विक्रीबाबतही उच्चस्तरीय तपास पथक तपास करत आहे.
“रेल्वे स्थानकावरून प्रणालीमध्ये परिभाषित केलेल्या कोणत्याही क्लस्टर स्थानकांवरून सुरू होणाऱ्या प्रवासासाठी अनारक्षित तिकिटे दिले जाऊ शकतात. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून दिल्ली क्षेत्रातील ५७ स्थानकांपैकी कोणत्याही स्थानकावरून सुरू होणाऱ्या प्रवासासाठी अनारक्षित तिकिटे दिले जाऊ शकतात. त्यामुळे विशिष्ट स्थानकावरून विशिष्ट तारखेला जारी केलेली अनारक्षित तिकिटे त्या स्थानकासाठी आणि तारखेसाठी असू शकतात किंवा नसू शकतात,” असंही अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.