Delhi Railway Station : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (१५ फेब्रुवारी) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली? याबाबत आता दिल्ली पोलीस आणि रेल्वे प्रशासन चौकशी करत आहे. मात्र, कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती सांगण्यात येत आहे. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर आता केंद्र सरकार अलर्ट झालं आहे.
गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि दिल्ली पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महाकुंभमेळ्यादरम्यान वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, चेंगराचेंगरी सारख्या घटना पुन्हा घडू नये किंवा अशा घटना टाळण्यासाठी रेल्वेने देशातील ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर होल्डिंग झोन तयार करण्याची योजना आखली आहे. ६० पेक्षा जास्त रहदारीच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी होल्डिंग झोन तयार करण्यात येणार आहेत. तसेच संकट व्यवस्थापनासाठी ‘एआय’ची देखील मदत घेतली जाणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. या बरोबरच स्थानिक अधिकारी संकट व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रशिक्षण देखील घेतील असंही सांगण्यात येत आहे. या बरोबरच ‘एआय’सह तंत्रज्ञानाचा वापर गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे. विशेषतः ट्रेनच्या विलंबाच्या वेळी हा वापर करण्यात येणार आहे.
दिल्लीत चेंगराचेंगरीची घटना कशी घडली?
रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा १८ झाला असून त्यात ११ महिला व पाच मुलांचा समावेश आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली, याची चौकशी दिल्ली पोलीस आणि रेल्वेने सुरू केली आहे. रेल्वेने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी अडीच लाख तर किरकोळ जखमींना एक लाखाची मदत जाहीर केली.
दरम्यान, शनिवारी रात्री १० च्या सुमारास चेंगराचेंगरी झाली जेव्हा ट्रेनच्या घोषणांमध्ये गोंधळलेल्या प्रवाशांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील अरुंद जिन्याने प्लॅटफॉर्म १६ च्या दिशेने धाव घेतली असता चेंगराचेंगरी झाल्याचं सांगितलं जातं. चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या चौकशीचा अहवाल लवकरच सादर होण्याची अपेक्षा आहे.