दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागांवर विजय प्राप्त केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हर्षवर्धन यांना दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी चर्चेसाठीचे (गुरूवार) निमंत्रण दिले.
हर्ष वर्धन हे सध्या छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या शपथविधीस उपस्थित असून ते आज संध्याकाळी दिल्लीत परतून उपराज्यपालांची भेट घेतील.
छत्तीसगडमध्ये हर्ष वर्धन म्हणाले की, “दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी मला चर्चेसाठीचे निमंत्रण पाठविले आहे. परंतु, मला चर्चेचा विषय अद्याप समजलेला नाही. छत्तीसगडमधून परतल्यावर मी लगेचच उपराज्यपालांची भेट घेणार आहे.”
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपने ३२ जागा जिंकल्या आहेत. परंतु, बहुमताचा आकडा भाजपला गाठता आलेला नाही. आम आदमी पक्षाने या निवडणुकीत २८ जागा जिंकल्या आहेत. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी आपण कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्याने दिल्लीमध्ये पेचप्रसंग निर्माण झाला आहे.