दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आणि उत्तर प्रदेश दहशतवादीविरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याप्रकरणी सहा जणांना मंगळवारी अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चार संक्षयित दहशतवाद्यांना मध्यरात्रीनंतर दिल्लीमधील एका न्यायाधिशांच्या घरीच त्यांच्यासमोर हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. जान महंमद शेख (४७, महाराष्ट्र), ओसामा ऊर्फ सामी (२२, जामियानगर), मूलचंद ऊर्फ साजू (४७, रायबरेली), झिशान कमर (२८, अलाहाबाद), महंमद अबू बकर (२३, बहराइच), महंमद अमीर जावेद (३१, लखनऊ) या सहा जणांना अटक करण्यात आल्याचे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले. यापैकी झिशान आणि ओसामाला बुधवारी न्यायालयासमोर सादर करण्यात आलं. विशेष पथकाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींनी मोठा खुलासा केल्याचं वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. बंगाली भाषा बोलणारे १६ आणि पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले काही तरुण पश्चिम बंगालमध्ये लपले आहेत. तसेच आपण या दहशतवादी कृत्यामध्ये पैशांसाठी नाही तर जिहादसाठी सहभागी झालो आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंगला गेल्याची माहितीही या दोघांनी दिलीय.
उत्तर प्रदेश निवडणुकांच्या दृष्टीने तपास सुरु
भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्यासाठी आलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोघांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (आयएसआय) प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अटक करण्यात आलेल्या कथित दहशतवाद्यांनी खुलासा केला आहे की गर्दीच्या ठिकाणी हल्ले करण्याचा त्यांचा इरादा होता. अनेक ठिकाणी आपण रेकीसुद्धा केली होती असंही या दहशतवाद्यांनी म्हटलं आहे. यामध्ये मुंबईमधील गर्दीची ठिकाणं, ट्रेन आणि मोठ्या मंदिरांबरोबरच उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमधील मोठ्या मैदानांचाही समावेश आहे. या मोठ्या मैदानांमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये घातपात घडवून आणण्याचा यांचा काही इरादा होता का या दृष्टीनेही तपास यंत्रणा तपास करत आहेत.
Delhi Police Special Cell has busted a Pak-organised terror module, arrested 6 people including two terrorists who received training in Pakistan pic.twitter.com/ShadqybnKU
— ANI (@ANI) September 14, 2021
एकाच व्यक्तीला केला जायचा सलाम
विशेष तुकडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी झिशान आणि ओसामा यांनी आपल्याला पैशाचा मोह नव्हता असं गुन्ह्याची कबुली देताना सांगितलं आहे. केवळ जिहादसाठी आम्ही पाकिस्तानला जाऊन दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण घेतल्याचा धक्कादायक खुलासा या दोघांनी केलाय. या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये आपली राहण्याची सोय एका फार्म हाऊसवर करण्यात आली होती असंही या दोघांनी म्हटलंय. या ठिकाणी लष्कराचा खोटा पोषाख घालून अनेकजण वावरत होते. मात्र साध्या कपड्यांमध्ये आलेली एक व्यक्ती लष्करी अधिकारी निघाली असंही या दोघांनी सांगितलं. साध्या कपड्यांमधील व्यक्तीलाच इतर सर्वजण सलाम करत असल्याचंही या दोघांनी सांगितलं. पाकिस्तानी लष्कराचा गणवेश घालून असणारे अधिकारी हे आयएसआयमधील फार खालच्या स्तरावरील लोक होते. त्यामुळेच त्यांना गणवेशात असूनही कोणी सलाम करत नव्हतं, असं या दोघांनी सांगितलं.
कोणकोणत्या गोष्टी शिकवण्यात आल्या?
तसेच आपल्याला एके ४७ बंदूक उघडणे आणि चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. चिनी पिस्तुलाचेही प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आयईडी कसं आणि कुठे लावता येईल याचं प्रशिक्षणही या दहशतवाद्यांना देण्यात आलेलं. रेकी करताना कोणी आपल्याला पकडलं तर त्याला कशापद्धतीने छोट्या हत्याराने जखमी करुन तिथून पळ काढता येईल हे सुद्धा या तरुणांना शिकवण्यात आलेलं. कोणी रंगेहाथ पकडल्यास आणि वेळ पडल्यास कोणतेही हत्यार न वापरता एकाद्याचा जीव कसा घ्यावा, गर्दीच्या ठिकाणी कोणी पाठलाग करत असेल तर कशाप्रकारे एखाद्या हॉटेल किंवा इतर ठिकाणी घुसून त्याच्यापासून वाचता येईल अशा गोष्टींचंही प्रशिक्षण या तरुणांना देण्यात आलेलं.