Trademark Controversy Updates: गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर दिल्लीतील एका प्रकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दिल्ली ट्रेडमार्क ऑफिसने एका अशा नावाला ब्रँडचं नाव म्हणून मंजुरी दिली जे नाव कमी आणि शिवी जास्त वाटावी. अर्थात, अर्जदाराने नेमकं याच नावासाठी का अर्ज केला होता? हे अजून समोर आलेलं नसलं, तरी आपल्या बिस्किट व स्नॅक्सच्या उत्पादनांसाठी त्यांनी या नावाची निवड केली होती, अशी माहिती फायनान्शियल एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आली आहे. झालेली गफलत लक्षात येताच ही मंजुरी रद्द करण्यात आली आहे.
नेमकं घडलं काय?
सोमवारी जाहीर झालेल्या ट्रेडमार्क जर्नलमध्ये या नावाचा झालेला समावेश अनेकांना खटकला. त्यावर काहींनी आक्षेप घेतला तर काहींनी त्यामागचा अर्थ व कारण शोधण्याचा प्रयत्न केला. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी या नावासाठी साधना गोस्वामी यांनी अर्ज केला होता. ट्रेडमार्क ऑफिसनं यासंदर्भात प्रकाशित केलेल्या जर्नल क्रमांक २२००-० मध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. १७ मार्च २०२५ रोजी हे जर्नल प्रकाशित करण्यात आलं होतं. मात्र, त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर ट्रेडमार्क ऑफिसनं सारवासारव करत या नावाला दिलेली मंजुरी मागे घेतली.
CHUTIYARAM नावासाठी केला होता अर्ज!
संबंधित अर्जदाराने विनंती अर्ज केलेल्या नावावर ट्रेडमार्क कार्यालयाच्या स्क्रुटिनी विभागाकडून आक्षेप आला. त्यानंतर याबाबत खुलासा करत ट्रेडमार्क कार्यालयाने दिलेली मंजुरी मागे घेतल्याचं स्पष्ट केलं. “सदर अर्ज चुकून मंजूर झालेला आहे. या नावाच्या नोंदणीवर ज्यांना आक्षेप नोंदवायचे असतील, ते अजूनही आक्षेप नोंदवू शकतात. ट्रेड मार्क्स अॅक्ट १९९९ च्या कलम ९/११ अंतर्गत हे नाव नोंदणीसाठी आवश्यक निकषांची पूर्तता करत नाही”, असं निवेदनच ट्रेडमार्क कार्यालयाकडून काढण्यात आलं आहे.
भारतीय ट्रेडमार्क कायद्याच्या कलम ९ (२) (क) नुसार ट्रेडमार्कमध्ये कोणत्याही प्रकारे गैरप्रकारांना प्रोत्साहन देणारं, अश्लील किंवा नैतिकतेच्या मूल्यांना धरून नसणारं नाव वापरलं जाऊ नये. मात्र, यासंदर्भात घेण्यात आलेल्या कोणत्याही सुनावणीला अर्जदार हजर न होऊनदेखील या ट्रेडमार्कला मान्यता देण्यात आल्याचं यासंदर्भातल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
अर्जदार नावावर ठाम
दरम्यान, या नावासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार आधीपासूनच या नावासाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे. स्नॅक्स व बिस्किटांचा संपूर्ण ब्रँड याच नावानिशी बाजारपेठेत उतरवण्याचा त्यांचा आग्रह आहे. याआधी अशाच प्रकारचे CHUTIYAWALA आणि CHUTIYALAL हे दोन नावं ट्रेडमार्क म्हणून मंजूर व्हावेत असे अर्ज ट्रेडमार्क कार्यालयाकडे आले होते. मात्र, ही दोन्ही नावं त्या त्या वेळी फेटाळण्यात आली होती.