नवी दिल्ली : प्रख्यात लेखिका महाश्वेता देवी यांची लघुकथा आणि दोन दलित लेखकांना पर्यवेक्षण समितीने इंग्रजी अभ्यासक्रमातून हटवल्यामुळे दिल्ली विद्यापीठ टीकेचा विषय ठरले आहे.

विद्वत परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या परिषदेच्या १५ सदस्यांनी पर्यवेक्षण समितीविरुद्ध (ओव्हरसाईट कमिटी) भिन्नमत टिप्पणी सादर केली. ‘लर्निग आऊटकम्स बेस्ट करिक्युलम फ्रेमवर्क’च्या पाचव्या सत्रासाठीच्या इंग्रजी अभ्यासक्रमात  ‘कमाल गुंडगिरी’ असल्याचा आरोप त्यांनी केला.

ओसीने सुरुवातीला बामा व सुखार्थारिनी या दोन दलित लेखकांना हटवून त्यांच्या जागी ‘उच्चवर्णीय लेखक रमाबाई’ यांना आणले, असे ते म्हणाले. यानंतर पश्चातबुद्धीने या समितीने कुठलाही शैक्षणिक तर्क न देता अचानक महाश्वेता देवी यांची ‘द्रौपदी’ ही एका आदिवासी महिलेवर असलेली प्रसिद्ध कथा हटवण्यास इंग्रजी विभागाला सांगितले, असाही आक्षेप त्यांनी नोंदवला.

‘या कथेच्या शैक्षणिक मूल्यामुळे ती १९९९ सालापासून दिल्ली विद्यापीठात शिकवली जात आहे, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आले’, याचा  सदस्यांनी उल्लेख केला. याशिवाय, साहित्य अकादमी व ज्ञानपीठ पुरस्काराच्या विजेत्या आणि पद्मविभूषण सन्मानाच्या मानकरी असलेल्या महाश्वेता देवी यांची दुसरी एखादी कथा स्वीकारण्यासही समितीने नकार दिला, असे त्यांनी सांगितले. इंग्रजी विभागाच्या अभ्यासक्रम समितीला न कळविताच हे बदल करण्यात आले.

Story img Loader