दिल्ली विद्यापीठात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या एक युवकाची ऑनर किलिंगमुळे हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ईशान्य दिल्लीत राहणाऱ्या हिंमाशू शर्मा याचे अपहरण करून उत्तर प्रदेशच्या बागपत येथे नेण्यात आले आणि तिथे त्याला जबर मारहाण करून हत्या करण्यात आली. हिमांशूने आमच्या १९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता आणि त्या व्हिडीओवरून तो तिला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप खून करणाऱ्यांनी केला आहे. मात्र हिमांशूच्या आईने मारेकऱ्यांचे हे आरोप फेटाळून लावले. मुलगा आणि मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यावरू कदाचित त्याची हत्या केली असावी, असेही पोलिसांकडून सांगितले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिमांशू शर्माची (२०) आई रजनी शर्मा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ज्यांनी माझ्या मुलाचा निर्घृण खून केला, त्यांचे आरोप खोटे आहेत. बलात्कारासारखा कोणताही प्रकार घडलेलाच नाही. तर हिमांशूचे काका अनिल शर्मा यांनी सांगितले की, हिमांशूला शनिवारी सदर मुलीकडून व्हिडीओ कॉल आला होता. जेव्हा हिमांशू मुलीने सांगितलेल्या ठिकाणी गेला, तेव्हा तिच्या कुटुंबातील चार ते पाच लोकांनी त्याचे अपहरण करत त्यांच्या बागपत येथील गावी नेले आणि तिथे जबर मारहाण करत त्याचा खून केला.

पीएम आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच ११ विवाहित महिलांनी प्रियकरासह केला पोबारा; पतींची पोलिसांत तक्रार!

दरम्यान बागपत पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस अधिकारी हरीष भदौरीया यांनी या प्रकरणी दोन लोकांना अटक केल्याचे सांगितले. बागपतचे पोलीस उपअधीक्षक एनपी सिंह यांनी सांगितले की, हिमांशूने सदर मुलीवर बलात्कार केल्याचा दावा मुलीच्या आईने केला आहे. एनपी सिंह पुढे म्हणाले की, मुलीच्या कुटुंबियांनी तिच्या मोबाइलवरून मुलाला मेसेज करून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आला नाही. त्यानंतर मुलीकरवी व्हिडीओ कॉल करून त्याला बोलावून घेतले. बागपत येथे आणून ते त्याला फक्त धडा शिकविण्यासाठी मारहाण करणार होते. मात्र जबर मार लागल्यामुळे हिमांशूचा मृत्यू झाला.

हिमांशूच्या आईच्या तक्रारीनंतर मुलीच्या कुटुंबातील सात लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये मुलीच्या आईचाही समावेश आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १४० नुसार अपहरण करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

ईशान्य दिल्लीच्या उस्मानपूर भागात रजनी शर्मा आपल्या दोन मुलांसह राहत आहेत. रजनी शर्मा यांचे पती काही वर्षांपूर्वी घर सोडून गेले होते. शनिवारी जेव्हा हिमांशू घाईघाईत घरातून निघाला तेव्हाच त्यांना संशय आला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी न आल्यामुळे रजनी शर्मा यांनी नातेवाईकांना याची माहिती देऊन मुलगा बेपत्ता असल्याचे सांगतिले. त्यानंतर रात्री त्यांच्या शेजारी असलेल्या महिलेने हिमांशूचे आम्ही अपहरण केल्याचे सांगितले. तसेच तिच्या कुटुंबियांना व्हिडीओ कॉल करून जखमी अवस्थेत असलेल्या हिमांशूलाही दाखवले.

हिमांशू आणि सदर मुलीचे संबंध असल्याचे सांगितले जाते. मात्र हे संबंध मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यामुळे हिमांशूचा खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी याबाबत विचारणा केल्यानंतर रजनी शर्मा यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. जर मुलीच्या कुटुंबियांनी माझ्याशी चर्चा केली असती तर मी यातून मार्ग काढला असता. आता माझा मुलगा जगात नाही, त्याची छोटी बहीण आणि मीच उरलो आहोत, असे सांगून आईने हंबरडा फोडला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi university student abducted from near delhi home beaten to death in up baghpat over love affair kvg