दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आज तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे म्हणने आहे की, केजरीवाल यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्यांनीच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच, तोडफोड करणाऱ्या महिला भाजपाच्या नेत्या होत्या हे भाजपाने मान्य केलं असल्याचंही आम आदमी पार्टीने म्हटलं आहे. चौकीदारांना कॅमेऱ्यांची कसली भीती? असा टोला देखील ‘आप’ ने भाजपाला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे भाजपाने हे आम आदमी पार्टीचे घाणरेडे राजकारण असल्याचं म्हटलं आहे. तसेच, धरणे आंदोलन करणाऱ्या महिला नगरसेविकांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावले गेले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अगोदरपासूनच बरेच कॅमेरे आहेत. हा कोणत्याही महिलेच्या वैयक्तिक बाबींवर हल्ला आहे. ‘आप’ चा महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. हे अतिशय लाजीरवाणं आहे. असं देखील भाजपाकडून सांगण्यात आलं आहे.

महापौर जयप्रकाश यांनी याबाबत बोलताना सांगितले की, आम्ही सात दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आहोत. मात्र, मुख्यमंत्री आम्हाला भेटणं तर दूरच, आमच्याशी बोलू इच्छित देखील नाहीत. आज महिला नगरसेविका झोपलेल्या असताना, मुख्यमंत्री कार्यालयाचे लोकं महिलांच्या खासगीपणाचे भान न राखता सीसीटीव्ही कॅमेरे बसवत होते, ज्याचा महिला नगरसेविकांनी विरोध केला. तुम्ही अशी अराजकता पसरवू नका, आम्ही कोणताही कॅमेरा तोडला नाही. केवळ महिला नगरसेविकांवर जो सीसीटीव्ही लावला जात होता, तो लावू दिला नाही.

तर, भाजपाच्या या विधानावर आम आदमी पार्टीकडून प्रतिक्रिया दिली गेली आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून कसली भीती? भाजपा नेता सीसीटीव्ही कॅमेरा काय करू इच्छित होते? असा प्रश्न भाजपाला करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi vandalism outside chief minister kejriwal house msr