दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरली आणि या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमान विमान तळावर पोहचताच प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी गर्दी केली होती. काही प्रवाशांनी तर आपात्कालीन मार्गाचा वापर करत विमानातून बाहेर पडण्यास प्राधान्य दिलं. बॉम्ब ठेवल्याची बातमी समोर आल्याने आपात्कालीन मार्ग आणि मुख्य दरवाजे यांमधून प्रवाशांना सुरक्षित पद्धतीने बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर हे विमान तपासणीसाठी खुल्या ठिकाणी नेण्यात आलं होतं.
दिल्ली विमानतळावर घडली घटना
दिल्ली विमानतळावर ही घटना घडली आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास उड्डाणापूर्वी इंडिगो क्रूला वॉशरुममध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये विमानात बॉम्ब ठेवल्याचं म्हटलं होतं. यामुळे क्रूने विमानतळ प्रशासनाला ही माहिती दिली. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितलं. विमान मोठं असल्याने मधली जागा अरुंद असल्याने दोन्ही दरवाजे आणि आपात्कालीन दरवाजेही उघडले. त्यानंतर काही प्रवाशांनी या मार्गातूनही उड्या मारल्या या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. सगळे प्रवासी सुखरुप असल्याचं विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केलं.
श्वान पथकाला करण्यात आलं पाचारण
या सगळ्यानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. तसंच बॉम्ब निरोधक पथकाने विमानाची तपासणी केली. त्यानंतर ही अफवा असल्याची बाब समोर आली. टॉयलेटमध्ये एक टिश्यू पेपरवर बॉम्ब असं लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे विमान खुल्या भागात नेण्यात आलं. तिथे विमानाची कसून तपासणी करण्यात आली ज्यामध्ये काहीही सापडलं नाही.
दिल्लीत मागच्या महिन्यात ५० हून अधिक शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल पाठवण्यात आला होता. यामुळे बरीच अफरातफर झाली होती. शाळेत आलेल्या मुलांना घरी पाठवण्यात आलं. तसंच शाळांमध्ये श्वान पथकं आणि बॉम्ब निरोधक पथक पाठवण्यात आली होती आणि शाळांची तपासणी करण्यात आली होती. हा मेलही अफवाच होता असंही स्पष्ट झालं.