पीटीआय, नवी दिल्ली
दिल्लीमध्ये मतदारयाद्यांवरून सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आणि विरोधी पक्ष भाजपदरम्यान वाद निवळलेला नसतानाच, दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यासंबंधी नवीन माहिती उघड केली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मतदारयादीतून नाव वगळण्यासाठी ८२ हजार ४५० अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, २९ नोव्हेंबरपासून चार लाख ८० हजार नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे.
दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी तयार केली जात असून ती ६ जानेवारी २०२५ला प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर मतदारांना त्यामध्ये नावे जोडणे, वगळणे किंवा दुरुस्त करणे अशा काही विनंत्या असतील तर त्या करता येतील, असे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ओखला मतदारसंघामध्ये मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने दिली.
हेही वाचा : स्पेस डॉकिंगसाठी ‘इस्रो’ सज्ज, उपग्रहांचे यशस्वी उड्डाण, आता चाचणीची प्रतीक्षा
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या मतदारयादीच्या मुद्द्यावरून आप आणि भाजपदरम्यान वादावादी सुरू आहे. भाजपला ज्या मतदरासंघांमध्ये पराभवाची भीती वाटत आहे, तिथे मतदारांची नावे वगळण्यासाठी घाऊक प्रमाणात अर्ज दाखल केले जात आहेत, असा आरोप आपने भाजपवर केला आहे. तर आप बेकायदा रोहिंग्या आणि बांगलादेशी स्थलांतरितांचा मतपेढी म्हणून वापर करण्यासाठी त्यांना मतदार ओळखपत्र मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा भाजपने केला आहे. यावरूनच आप-भाजपमध्ये खऱ्या अर्थाने वाद रंगला आहे.
हेही वाचा : जिमी कार्टर… भारताशी जवळीक राखणारा नेता
पुजाऱ्यांना १८,००० वेतनाचे आश्वासन
दिल्लीमध्ये आप पुन्हा सत्तेवर आल्यास पुजारी ग्रंथी सम्मान योजना लागू करण्यात येईल आणि त्याअंतर्गत मंदिरांचे पुजारी आणि गुरुद्वारांच्या ग्रंथींना दरमहा १८ हजार रुपये वेतन दिले जाईल असे आश्वासन माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिले. दिल्लीमध्ये सलग चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी आप प्रयत्नशील आहे. पुजारी आणि ग्रंथी आपल्या समाजाचा महत्त्वाचा भाग आहेत, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची योजना आम्ही आणत आहोत असे केजरीवाल म्हणाले.